दीपावलीच्या स्वागतास गोवा सज्ज
आज रात्री होणार नरकासूर प्रतिमा स्पर्धा : आकाशकंदील, विद्युत रोषणाईवर जनतेचा भर
पणजी : राज्यात आज दीपावली उत्सवाला प्रारंभ होत आहे. दिवाळी उत्सव प्रत्यक्षात उद्या रविवार दि. 12 रोजी पहाटे नरकासूर वधाने जरी प्रारंभ होत असला तरीदेखील आज शनिवार दि. 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भरगच्च कार्यक्रमांचे तसेच रात्री 12 वाजेपर्यंत नरकासूर स्पर्धा आयोजित केल्या आहेत. गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा भंग कऊ नका, असे कळविल्याने राज्यातील सर्व कार्यक्रम रात्री 12 च्या आत बंद केले जातील. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज सायं. 7 वा. विविध संस्था व संघटनामार्फत विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीच्या या उत्सवानिमित्त गोव्यात पणजी, म्हापसा, डिचोली, वाळपई, फोंडा, केपे, मडगाव, फातोर्डा, काणकोण, सांगे, वास्को अशा प्रमुख ठिकाणी नरकासूर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन केले आहे.
राज्यातील जनता दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. घराघरांवर रंगीबेरंगी आकाशकंदील लावण्यात येत आहेत. उद्या पहाटे नरकासूर प्रतिमांचे दहन झाल्यानंतर घराघरांवर व अंगणात पणत्या प्रज्वलित कऊन दिवाळी उत्सवाला प्रारंभ करतील. दिवाळी सणानिमित्त शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोहे व इतर साहित्य खरेदीसाठी गोव्यातील बाजारपेठा माणसांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. विविध प्रकारची मातीची भांडी, दिवे, पणत्या इत्यादींची विक्री करण्यासाठी छोटे व्यवसायिक बाजारपेठांमध्ये बसून विक्री करीत असल्याचे दृष्य दिसत होते. अनेक इमारतींवर विद्युत दिव्यांची रोषणाई उठून दिसत आहे. आज सायंकाळपर्यंत सारी तयारी पूर्ण होईल व सायंकाळी दीपावलीनिमित्त कार्यक्रमांना प्रारंभ होईल.
दिवाळीला पोह्यांचा फराळ
गोव्यात दिवाळी उत्सवाला विविध प्रकारचे पोहे तयार कऊन त्याचा फराळ सेवन केला जातो. तसेच पहाटे कडू प्राशन कऊन नंतर दिवसभरात गोड व तिखट पदार्थ खाल्ले जातात. बाजारात आकाशकंदील, विविध प्रकारचे दिवे, इलेक्ट्रिक दिवे, विविध प्रकारची फळे, पोहे, चुरमुरे तसेच अनेक भेटवस्तू आणि सुकामेवा इत्यादींची सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.