For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शैक्षणिक धोरणासाठी गोवा होतोय सज्ज!

12:16 PM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
शैक्षणिक धोरणासाठी गोवा होतोय सज्ज
Advertisement

यंदा नववीपासून होणार अंमलबजावणी : शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची माहिती,शिक्षकांना बेंगळूर येथे देणार प्रशिक्षण,चार वर्षांत अंमलबजावणीच्या पूर्णतेचे ध्येय

Advertisement

पणजी : नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून इयत्ता नववीसाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात येणार असून पुढील वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये इयत्ता तिसरी, सहावी करीता धोरण लागू होणार आहे. तसेच त्या वर्षी दहावीसाठी सदर धोरण पुढे नेले जाणार असून 2027-28 या वर्षात सर्व इयत्ता म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण नवीन धोरणानुसार देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी पर्वरी येथील एससीईआयटीमध्ये काल मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. आगामी चार वर्षात पहिली ते बारावीपर्यंत संपूर्ण नवे धोरण लागू करण्यात येणार आहे. त्याची तयारी केली जात असून नवीन धोरणातून शिक्षणाचा दर्जा वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नवीन धोरण लागू करणारे गोवा हे काही राज्यांपैकी एक असल्याचेही लोलयेकर यांनी नमूद केले.

मुख्याध्यापकांना मार्गदर्शन

Advertisement

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली आणि त्यांना नववीपासून लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची माहिती देण्यात आल्याचे लोलयेकर यांनी सांगितले. इयत्ता नववीसाठी हे धोरण कशा प्रकारे लागू होणार याचा तपशील त्यांनी थोडक्यात विषद केला. एनसीईआरटीचा अभ्यासक्रम नववीसाठी लागू करण्यात येणार असून गोवा सरकार शिक्षण खाते तो आवश्यक ते बदल करून तसाच घेणार आहे.

तीन भाषांचा पर्याय

नववीसाठी एकूण 3 भाषा होत्या, त्या तीनही राहणार असून त्यात एक परदेशी भाषा आणि दोन भारतीय भाषा घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. परदेशी भाषा ही प्रामुख्याने इंग्रजी असून कोकणी, मराठी, हिंदी, संस्कृत यापैकी कोणत्याही दोन भाषा घेता येतील. फ्रेंच, पोर्तुगीज, जर्मन या भाषा घेणाऱ्यांना त्यासाठी शिथिलता देण्यात येणार असल्याचे लोलयेकर यांनी स्पष्ट केले.

प्रश्नपत्रिका बोर्ड तयार करणार

नवीन धोरणानुसार प्रश्नप्रत्रिका गोवा बोर्ड निश्चित करणार असून परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्षा शाळेतच होणार असून त्याचे मूल्यांकन शाळेतच केले जाणार आहे.

अनेक नवीन विषय धोरणात समाविष्ट

अनेक नवीन विषय सदर धोरणात समाविष्ट करण्यात येणार असून त्यासाठी किमान 15 विद्यार्थी मिळाले तर शिक्षक देता येईल. पर्यावरण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, एनसीसी, मतदान जनजागृती हे विषय देखील धोरणात असून कुशलता आजमावण्यासाठी त्यावर आधारित काही अभ्यासक्रमही त्यात समाविष्ट आहेत, अशी माहिती लोलयेकर यांनी दिली.

शिक्षकांना प्रशिक्षण

नवीन धोरणानुसार शिक्षकांना खास प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी बेंगलोरच्या शिक्षण संस्थेकडे करार करण्यात आला आहे. तेथे शिक्षकांच्या एक एक तुकडीला प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. नवीन धोरणात विद्यार्थ्यांची प्रगती तपासली जाणार असून क्षमतेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. तो कमी पडल्यास प्रगती, क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

नवीन धोरणाचा घेतला जाणार आढावा

नववीसाठी नवे धोरण लागू केल्यानंतर त्याचा सातत्याने अधूनमधून शाळांना भेटी देऊन आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कृती ठरवण्यात येईल. वयाची 6 वर्षे पूर्ण झालेल्यांना पहिलीत प्रवेश देण्यात येणार असून कोणत्याही मुलाचे वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी होणार धोरण अंमलबजावणी

  • 2024-25    नववी
  • 2025-26    दहावी
  • 2026-27   अकरावी
  • 2027-28    बारावी
  • 2025-26    तिसरी व सहावी
  • 2026-27   चौथी व सातवी
  • 2027-28    पाचवी व आठवी
Advertisement
Tags :

.