देशासाठी गोवा महत्त्वपूर्ण राज्य!
केंद्रीय पर्यटन-संस्कृती राज्यमंत्री शेखावत यांचे प्रतिपादन : दोनापावला येथे राष्ट्रीय पर्यटन संमेलनाचे उद्घाटन
पणजी : गोवा हे देशातील सुंदर राज्यांमध्ये अग्रस्थानी आहे. म्हणून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. गोवा हे भारतासाठी महत्त्वपूर्ण राज्य असल्याने केंद्रातून या राज्याला भरीव मदत करण्यात येते. गोव्यात होत असलेले हे पर्यटन संमेलन गोव्याच्या पर्यटन उद्योगाच्या वाढीस नक्कीच फलदायी ठरेल, असे उद्गार केंद्रीय पर्यटन व संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी काढले. दोनापावला येथील पंचतारांकीत हॉटेलात काल गुरुवारी पश्चिम आणि मध्य भारत तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन संमेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री श्रीमती दिया कुमारी, गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटन खात्यातर्फे गोव्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच गोव्याने आजवर पर्यटन क्षेत्रात जे आमूलाग्र बदल घडवून आणले, त्याचबरोबर पर्यटकांना ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, त्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात पश्चिम आणि मध्य भारत तसेच केंद्र शासित प्रदेशांच्या मान्यवरांनी आपले अनुभव कथन करून गोवा हेच पर्यटन कार्यक्रम घेण्यासाठी व महोत्सव आयोजन करण्यासाठी योग्य ठिकाण असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी शेखावत यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत केले. दोनापावल येथील हॉटेलमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शेखावत यांची भेट घेऊन स्वागत केले.