गोवा बागायतदार निवडणुकीत निरुत्साह
केवळ 38.27 टक्के मतदान : उद्या कुर्टी येथे मतमोजणी : निकालाकडे सदस्यांचे लक्ष
फोंडा : गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या 19 संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी रविवारी मतदान झाले. फोंडा तालुक्यासह डिचोली व सांगे तालुका केंद्रावर झालेल्या निवडणुकीत एकूण 7363 मतांपैकी 3009 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 38.27 टक्के मतदान झाले. मतमोजणी मंगळवार दि. 22 रोजी सकाळी 10 वा. पासून कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनमध्ये होणार आहे. संचालक मंडळाच्या 19 जागांपैकी दोन महिलांसह एकूण सात उमेदवारांची बिनविरोध निवड यापूर्वीच झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात खुल्या गटातील 12 जागांसाठी तीन केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. वर्ष 2024 ते 2029 या पाच वर्षांसाठी हे संचालक मंडळ निवडले जाणार आहे. गोवा बागायतदारचे एकूण 10,042 मतदार असून सत्तरी तालुक्यातील सर्व तिनही उमेदवार तर काणकोण तालुक्यातून एक असे चार उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित फोंडा, डिचोली व सांगे केंद्रावर मतदान घेण्यात आले. फोंडा तालुक्यात एकूण 4459 पैकी 1327 (29.76 टक्के), डिचोली तालुक्यात एकूण 2012 पैकी 978 (48.61 टक्के) व सांगे तालुक्यात एकूण 1392 पैकी 704 (50.57 टक्के) मतदान झाले.
फोंड्यातील सहा जागांसाठी नऊ उमेदवार
फोंडा तालुक्यातून खुल्या गटातील 6 जागांसाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये पंढरीनाथ श्रीपाद चाफाडकर, हेमंत दुर्गाराम कथने, सुरेश शाबा केरकर, विकास विश्वनाथ प्रभू, बाळ आत्माराम सहकारी, हेमंत प्रभाकर सामंत, समीर देविदास सामंत, नरेंद्र केशव सावईकर व महेश साजू शिलकर यांचा समावेश आहे. फोंडा तालुक्यात महिला गटातून नूतन सतीश गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
डिचोली तालुक्यातून खुल्या गटातील 3 जागांसाठी व्यंकटेश उर्फ गौतम गुरुदास मोने, विनायक नामदेव सामंत, रोहन वामन सावईकर, शुभदा मोहनदास सावईकर व विलास विष्णू सावईकर हे 5 उमेदवार आहेत. डिचोली विभागात डिचोली, तिसवाडी, बार्देश व पेडणे या तालुक्याचा समावेश आहे. सांगे तालुक्यातून खुल्या गटातील 3 जागांसाठी जयेश अशोक पाटील, जितेंद्र आनंद पाटील, पांडुरंग शांताराम पाटील, रमेश घनश्याम प्रभू दाभोळकर व यशवंत भगवंत तेंडुलकर हे 5 उमेदवार आहेत. सांगे विभागात सांगे, केपे, सालसेत, मुरगाव व धारबांदोडा या तालुक्यांचा समावेश आहे.
सत्तरी तालुक्यातून खुल्या गटातील 3 जागांवर वामन लक्ष्मण बापट, संतोष विश्वनाथ केळकर व प्रशांत प्रभाकर मराठे हे तिघेही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. काणकोण तालुक्यातून खुल्या गटातील एका जागेसाठी कमलाक्ष विश्वेश्वर टेंगसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच दक्षिण गोव्यातून महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर तनुजा नागेश सामंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय एसटी एससींसाठी आरक्षित जागेवर रामनाथ राघलो गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार निबंधक खात्याचे राजू मगदूम यांनी साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तर निर्वाचिन अधिकारी म्हणून प्रसन्न शेटकर हे काम पाहत आहेत. मंगेश फडते यांनी त्यांना साहाय्य केले. निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे हाताळल्याबद्दल सर्व उमेदवारांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.