गोवा सरकार डॉक्टरांच्यामागे खंबीरपणे उभे राहणार : राणे
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची पत्रकार परिषदेमध्ये महिती
वाळपई : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर आता डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गोव्यात कार्यरत असलेल्या सरकारी व खाजगी डॉक्टरांना सुरक्षा कवच प्राप्त व्हावे, यासाठी गोवा सरकार गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले आहे. काल रविवारी वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राणे यांनी पश्चिम बंगालमध्ये जो प्रकार घडला तो पूर्णपणे निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारा असल्याचे सांगितले. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या ममता बॅनर्जी या महिला असतानासुद्धा सदर ठिकाणी महिलांवर अत्याचार होणे हे खरोखरच खेदजनक आहे. ममता बॅनर्जी पूर्णपणे अपयशी ठरलेल्या आहेत. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली.
गोव्यातील सर्व सरकारी ऊग्णालयांमध्ये सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेरा यापूर्वीच आहेत, ज्या ठिकाणी नाहीत तेथे त्वरित बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल. महिलांच्या सक्षमीकरणाच्या वल्गना करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा, असे राणे म्हणाले. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनाही सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही पॅमेरा बसविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. कोलकाता या ठिकाणी घडलेल्या प्रकारासंदर्भात गोव्यातही डॉक्टरांनी पुकारलेला संप हा रास्त आहे. जर कोणावरही अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा विरोध करणे व त्याच्या विरोधात निषेध व्यक्त करणे हे लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला अधिकार प्राप्त झालेले आहेत. सरकार डॉक्टरांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे. यामुळे डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळात डॉक्टरांना अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षा निर्माण व्हावी यासाठी गांभीर्याने लक्ष देण्यात येणार आहे. या संदर्भात आपले मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे, असेही राणे यांनी सांगिले.