‘एआय’ने फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी करणारे गोवा पहिले राज्य
गोव्याचा आरोग्य सेवेत ऐतिहासिक निर्णय : फुफ्फुसाच्या कर्करोगावरील लढ्यास नवे बळ नाविन्यपूर्ण ‘प्राइसिंग पॉलिसी’चीही घोषणा
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पाठिंब्याने गोव्याने आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी सुरू करून गोवा हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. यामुळे गरीब ऊग्णांना लाखो रुपये खर्च न करता अत्याधुनिक तपासणी व उपचाराची सुविधा आता राज्यातच उपलब्ध झाली असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी याला ऐतिहासिक यश म्हटले आहे.
क्युअर एआय आणि एस्ट्रा झेनिका कंपनीतर्फे गोवा सरकारने बुधवारी पणजीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ’प्रायसिंग पॉलिसी फॉर इनोव्हेटिव्ह लाइफसेव्हिंग थेरपीज (पीपीआयएलटी) लागू करण्याची घोषणा केली आहे. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे बोलत होते. आरोग्य सचिव अऊण कुमार मिश्रा, आरोग्य संचालक डॉ. रुपा नाईक, डीन तिवारी, क्युअर एआयचे मुख्य कार्यकारी संचालक प्रशांत वारियर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
उच्च खर्चामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या प्रगत उपचार पद्धती आता गोव्यात अधिक सुलभ होणार आहेत. (पीपीआयएलटी) धोरणाची सुरुवात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारापासून होणार असून पुढे दुर्मीळ व गुंतागुंतीच्या असंसर्गजन्य आजारांवरही हे धोरण लागू होणार आहे. यासाठी सरकार आणि औषधनिर्मिती कंपन्यांदरम्यान गोपनीय व परिणामाधारित करार करण्यात येतील. महागडी असलेली औषधे, निदान साधने व वैद्यकीय उपकरणे या पॉलिसीमुळे आता कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत.
क्युअर.एआयचे संस्थापक प्रशांत वारियर यांनी सांगितले की, गोव्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे यशस्वी एकत्रीकरण झाले आहे. तपासणीपासून उपचारापर्यंत संपूर्ण साखळी निर्माण करण्यात या भागीदारीने मोलाची भूमिका बजावली आहे. गोवा सरकार, क्युअर एआय आणि एस्ट्रा झेनिका यांच्या भागीदारीत राबविले जाणारे हे मॉडेल देशातील पहिलेच असून, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या तपासणी व उपचारासाठीचा हा आराखडा भविष्यात जगभरातील आरोग्य व्यवस्थांसाठी एक आदर्श मार्गदर्शक ठरू शकतो.
आरोग्यसेवेत नवे पर्व
कर्करोग, दुर्मीळ अनुवंशिक विकार किंवा प्रतिकारशक्तीवर होणारे आजार यांचे उपचार वर्षाकाठी अनेकदा पन्नास लाख ऊपयांहून अधिक खर्चिक असतात. त्यामुळे हे उपचार गरजूंपर्यंत पोहोचणे कठीण होते. अशा वेळी गोव्याने स्वीकारलेली ही नवी उपचार पॉलिसी आरोग्य समानतेसाठीची मोठी आणि योग्यवेळी उचललेली पायरी आहे. ऊग्णांना वेळेत आणि परवडणाऱ्या किमतीत उपचार मिळावेत, हाच या निर्णयाचा गाभा असून यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत नवे पर्व सुरू होईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी नमूद केले आहे.
एआय चा क्रांतिकारी वापर
2024 पासून गोव्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा क्रांतिकारक वापर सुरू झाला आहे. या अत्याधुनिक सेवेद्वारे आतापर्यंत तब्बल सत्तर हजारांहून अधिक छातीचे एक्स-रे तपासण्यात आले. त्यातून सहा हजारांपेक्षा जास्त फुफ्फुसातील गाठींचा शोध लागला, तर पाचशेहून अधिक ऊग्णांना ’उच्च जोखीम’ गटात ओळखण्यात आले. लवकर निदानाची ही सुविधा मिळाल्यामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळाले, जीव वाचले आणि महागड्या उपचारांचा खर्चही टळला. ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात झालेली एक ऐतिहासिक झेप ठरली आहे.