For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात रस्ता अपघातात दररोज सरासरी एकापेक्षा जास्त मृत्यू

06:04 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात रस्ता अपघातात दररोज सरासरी एकापेक्षा जास्त मृत्यू
Advertisement

गोव्यात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. काही केल्या रस्ते अपघात थांबता थांबेनात. गोव्यात रस्ता अपघातात दररोज किमान एक बळी जात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. रस्ता अपघात ही आता नित्याचीच बाब बनली आहे. यासाठी सरकारला किती म्हणून दोषी धरणार! वाहन चालविणारे स्वत:हून जोपर्यंत मर्यादा घालून घेणार नाही तोपर्यंत रस्ते अपघात सुरूच राहणार हे नक्की...

Advertisement

रस्ता अपघातात गंभीर चिंतेची बाब म्हणजे, या अपघातात बळी पडलेल्यांपैकी बहुतेक जण तरुण पिढीतील आहेत. त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळीवर उद्भवणारी परिस्थिती कशी असेल, याचा विचार करणेही कठीण आहे. रस्ते अपघातात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.

गोव्यात अपघातांची सलग मालिकाच सुरू आहे. सोमवार दि. 24 व मंगळवार दि. 25 जून रोजी दक्षिण गोव्यात चार वेगवेगळ्या अपघातात चार जणांचे बळी गेले. त्यात बळी गेलेल्या तीन व्यक्ती या सासष्टी तालुक्यातील होत्या. रस्ता अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी कृती योजना आखल्याची माहिती मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती मात्र अपघाताचे प्रमाण किंचितही कमी झालेले नाही.

Advertisement

गेल्या काही दिवसांमागे पार-खांडेपार येथे अवजड ट्रकखाली सापडून एका व्यक्तीचा बळी गेला. हा अपघात तर एवढा भयानक होता की, त्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला होता तर डोके ट्रकसोबत फरफटत 100 मीटर दूरवर जाऊन पडले होते. मयत व्यक्ती ट्रकखाली कधी सापडली, हे आपल्याला कळलेच नाही, अशी माहिती ट्रकचालकाने पोलिसांना दिली. यावरून चालक कशाप्रकारे ट्रक चालवित होता, याचा अंदाज येतो.

उसगाव येथे रस्त्यावरील गुरांना धक्का लागून एका दुचाकी चालकाचे निधन होण्याचा प्रकारही हल्लीच घडला. भटकी गुरे अपघाताला कारणीभूत ठरतात, हे या अपघातातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. उसगाव येथेच सहा महिन्यांच्या चिमुरडीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व असाहाय्यता पसरली होती.

जानेवारी 2024 पासून सुरू झालेले अपघातांचे सत्र कायम आहे. 1 ते 15 एप्रिल या पंधरा दिवसांत अविश्वसनीय 100 अपघात नोंद झाले. मुंगुळ, फातोर्डा येथे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. एप्रिल महिन्यात अवघ्या पंधरा दिवसात गोव्यातील रस्त्यांवरील मृतांची संख्या 19 झाली होती.

जीवितहानी सोबतच अपघातामध्ये कायमस्वरुपी जायबंदी झालेल्या लोकांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. सध्या परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की, सकाळी कामावर निघालेला माणूस संध्याकाळपर्यंत घरी परतेल की नाही, याची शाश्वती नाही.

2024च्या सुरुवातीच्या साडेतीन महिन्यांतील अपघातांची आकडेवारी आणखी भयावह आहे. 1 जानेवारी 2024 पासून गोव्यात 105 दिवसात तब्बल 852 अपघात झाले असून त्यात 99 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातामध्ये मृत्यू व्यतिरिक्त 130 जणांना गंभीर दुखापत झाली असून 276 जणांना किरकोळ दुखापत झाल्याची नोंद आहे. जून 2024 पर्यंत या संख्येत आता आणखीनही भर पडलेली आहे.

गोवा हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथील पर्यटकांची वाढलेली वाहतूक विशेषत: भाडेतत्त्वावर चालणारी वाहने रस्त्यावर भयानक परिस्थिती निर्माण करतात. गोव्यात आपली वाहने घेऊन येणारे पर्यटक भलत्याच जोशात असतात. गोव्यात पोहोचल्यावर अगोदर मद्यपान करण्यावर त्यांचा जास्त भर असतो. त्यात गोव्यातील रस्त्याची कल्पना नसल्याने ते अपघाताला आमंत्रण देत असतात.

त्यात भर म्हणून गोव्यातील पायाभूत सुविधा रस्त्यांवरील वाढत्या वाहनांच्या संख्येचा सामना करण्यास असमर्थ ठरत आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. खराब रस्त्याचे संरेखन, योग्य सूचना फलकांचा अभाव  आणि अपुरी प्रकाशयोजना देखील अपघातांना कारणीभूत ठरू लागली आहे.

बेजबाबदारीने, अतिवेगाने तसेच मद्यपान करून वाहन चालविणे आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे यासारखे मानवी घटक गोव्यासह सर्वत्र अपघातांना कारणीभूत ठरतात. शेवटी वाहतूक नियमांची अपुरी अंमलबजावणी व वाहतूक पोलिसांची कमतरता आणि अपुरी पोलीस गस्त यामुळेही वाहनचालकांना नियमांचे उल्लंघन करण्यास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक होते.

चांगले रस्ते व आवश्यक साधनसुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहेत. तरीही रस्ते अपघातात सर्रासपणे सरकारला दोष देता येणार नाही. मुळात वाहन चालकाने आपण वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणार, हे अगोदर लक्षात ठेवून त्यावर ठाम राहिले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांकडे वाहन देताना पालकांनी अगोदरच त्यांना एकूण परिस्थितीची कल्पना दिली तर बरेच अपघात टाळले जाऊ शकतात. त्यात वाहतूक पोलीस व वाहतूक अधिकाऱ्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर अधिक जागृती करणे आवश्यक आहे. ही जागृती करताना विद्यार्थ्यांसमोर अपघात आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती, याची माहिती पुरविणे महत्त्वाचे आहे. केवळ ‘लेक्चर’ देऊन व आकडेवारी सांगून जागृती होणार नाही किंवा विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार

नाही.

गोव्यात प्रत्येक घरात किमान दोन वाहने, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे वाहनांची वाढलेली संख्यादेखील अपघातांचे एक प्रमुख कारणे बनले आहे.

महेश कोनेकर

Advertisement
Tags :

.