For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चमकदार कीटक

06:21 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
चमकदार कीटक
Advertisement

रात्रीच्या अंधारात लुकलुकणारा काजवा आपल्याला माहीत आहे. काही कीटकांमध्ये अशी तळपण्याची क्षमता असते. हेडलाईट बीटल हा असाच एक कीटक आहे. तो अंधारात अतिशय तेजस्वी प्रकाश आपल्या अंगातून बाहेर टाकणारा कीटक आहे. या प्रकाशाचे वैशिट्या असे की, हा थंड प्रकाश असतो. याचा अर्थ असा की, या कीटकाच्या चमकण्यामधून प्रकाश मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असला, तरी उष्णता मात्र अतिशय कमी बाहेर पडते. त्यामुळे त्याचा प्रकाश प्रखर नसून शीतल असतो. पण तो इतका जास्त असतो, की रात्रीच्या वेळी एखाद्या वाहनाचे हेडलाईटस् लागल्याचा भास हा प्रकाश पाहणाऱ्यांचा होतो.  यामुळेच या कीटकाला ‘हेडलाईट बीटल’ अशी संज्ञा आहे. मात्र त्याचे शास्त्रीय भाषेतील नाव पायरोफोरस एसपी असे आहे. तो ‘क्लिक बीटल’ या प्रकारातील असून त्याला फायर बीटल असेही संबोधले जाते. तो एलाटेरिडे परिवारातील आहे. ते काजव्याप्रमाणेच प्रकाश शरीरातून बाहेर टाकतात. तथापि, काजवा आणि हा कीटक यांच्यातील अंतर असे आहे की. काजवा लुकलुकतो. तर हा कीटक सतत चमकत राहतो. त्याच्या प्रकाशनिर्मितीत खंड पडत नाही. तसेच या कीटकाचे आयुष्यही काजव्यापेक्षा बरेच जास्त असते, असे संशोधानातून सिद्ध झाले आहे. प्रकाश हे या कीटकाच्या संरक्षणाचेही साधन आहे. त्याला भक्ष्य करणारे पक्षी किंवा अन्य कीटक त्याच्या जवळ आल्यास तो अधिक तेजाने तळपतो. परिणामी, पक्षी किंवा अन्य कीटक यांना भीती वाटून ते त्याच्या जवळ येत नाहीत. या कीटकाच्या शरिरात विशिष्ट रसायनांची निर्मिती सतत होत राहते. हे रासायनिक द्रव्य प्रकाश निर्माण करते. त्याच्या डोक्याजवळच्या ‘प्रोटोनम’ मधून तो बाहेर पडतो. कीटक प्रजातीमध्ये हे हेडलाईट बीटल निसर्गाचा चमत्कार मानले जातात.

Advertisement

Advertisement
Tags :

.