लोकमान्य सोसायटीची देदीप्यमान वाटचाल
तिसावा वर्धापन दिन उत्साहात : ‘आनंदोत्सव’ योजनेचा शुभारंभ : देशातील नामांकित को-ऑप. सोसायटी
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 30 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या निमित्ताने संस्थेचे ठेवीदार आणि सभासदांसाठी ‘आनंदोत्सव’ या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. गुरुवार पेठ, टिळकवाडी येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, डॉ. दामोदर वागळे, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू यांच्यासह सीईओ अभिजीत दीक्षित, सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, बेळगावचे क्षेत्रीय प्रमुख मधुकर कुलकर्णी उपस्थित होते.
लोकमान्य सोसायटीच्या 30 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीवर संचालकांनी प्रकाश टाकला. लोकमान्य सोसायटी ही ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरली असल्यानेच देशातील एक नामांकित को-ऑप. सोसायटी म्हणून नावारुपास आली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व दिल्ली या ठिकाणी सोसायटीने यशस्वीरीत्या कार्य करून दाखवले आहे. ठेवीदारांसाठी ‘आनंदोत्सव’ ही नवी योजना सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘आनंदोत्सव’ योजनेतून ठेवीदारांना आकर्षक व्याजदर आणि विशेष लाभ मिळणार आहे. मान्यवरांनी सोसायटीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन लोकमान्य सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी सत्यव्रत नाईक यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.