‘दीपोत्सवा’चा जागतिक सन्मान
‘युनेस्को’च्या सांस्कृतिक वारसा उत्सव यादीत समावेश; दिल्लीत आनंदोत्सव, विद्युत रोषणाईने उजळली राजधानी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा उत्सव यादीत दिवाळीचा समावेश झाल्याची औपचारिक घोषणा बुधवार, 10 डिसेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित समारंभात करण्यात आली. याप्रसंगी विद्युत रोषणाईसह आतषबाजी करण्यात आल्याने आसमंत दिवाळीप्रमाणेच उजळून निघाले होते. दिल्ली सरकारच्यावतीने बुधवारी सायंकाळी विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
युनेस्कोने संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा उत्सवांची यादी जाहीर केली. त्यात घाना, जॉर्जिया, काँगो, इथिओपिया आणि इजिप्तसह अनेक देशांमधील सांस्कृतिक प्रतीकांचा समावेश आहे. या यादीत भारतात भव्य-दिव्यपणे साजरा होणाऱ्या दीपोत्सवाचाही सन्मान करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर झालेल्या या गौरवामुळे पंतप्रधान मोदी यांनी ‘दिवाळी ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे’ असे ट्विट करत समाधान व्यक्त केले. भारताने 2024 मध्ये दिवाळीसाठी आपले नामांकन सादर केले होते. आता दिवाळीचा समावेश युनेस्कोच्या यादीत केल्याने जागतिक स्तरावर भारताची सांस्कृतिक प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. यापूर्वी भारतातील 15 अमूर्त जागतिक वारसा उत्सवांचा यादीत समावेश झालेला आहे. यामध्ये दुर्गा पूजा, कुंभमेळा, वैदिक जप, रामलीला आणि छाऊ नृत्य अशा विविध सोहळ्यांचा समावेश आहे. या सांस्कृतिक वारशांचे जतन करून भावी पिढ्यांना हस्तांतरित करणे हे उद्दिष्ट आहे.

दिल्ली येथे सध्या युनेस्कोच्या अमूर्त वारसा विषयक आंतरसरकारी समितीच्या 20 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक 8 डिसेंबरला सुरू झाली असून 13 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या बैठकीला जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारने भारताची सांस्कृतिक ओळख जगासमोर मजबूतपणे प्रदर्शित करण्यासाठी बुधवार, 10 डिसेंबर रोजी विशेष दिवाळी उत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लाल किल्ला हे मुख्य ठिकाण केंद्रस्थानी ठेवत तेथे सांस्कृतिक कार्यक्रम, दिवे लावणे आणि पारंपरिक कलांचे प्रदर्शन घडवण्यात आले. तसेच याप्रसंगी शहरातील सरकारी इमारती विद्युत रोषणाईने सजवण्यात आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी दिवे लावण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले होते.
दिल्ली सरकारच्यावतीने दिल्ली हाट येथे दिवाळी साजरी करण्यात आली. हा संपूर्ण कार्यक्रम भारताच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक म्हणून जागतिक स्तरावर दिवाळी सादर करण्याच्या आणि युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली हाटमध्ये दीप पेटवून या आनंदोत्सवाला चालना दिली.

पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा
दिवाळीचा समावेश जागतिक वारसा उत्सव यादीत झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेल्या संबोधनात दिवाळीचे महात्म्य अधोरेखित केले. ‘दिवाळी सण हा संस्कृती आणि निसर्गाशी जोडलेला आहे. ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ती ज्ञान आणि धर्माचे प्रतीक आहे. युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याने या सणाची जागतिक लोकप्रियता आणखी वाढेल. भगवान श्रीराम यांचे आदर्श आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहोत.’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
युनेस्कोच्या यादीतील 15 भारतीय वारसास्थळे
दिवाळीचा समावेश होण्यापूर्वी, भारतातील 15 प्रमुख सांस्कृतिक परंपरा युनेस्कोच्या यादीत आधीच समाविष्ट करण्यात आल्या होत्या. कुंभमेळ्यासह रामलीला परंपरा, योग, नवरोज महोत्सव, कुडियाट्टम, कालबेलिया नृत्य (राजस्थान), छाऊ नृत्य, बौद्ध चैत्य नृत्य, आयुर्वेदिक ज्ञान, रणजितगड ढोल संस्कृती, गरबा (गुजरात), सैत (लोक रंगभूमी परंपरा), मुदिएट्टू (केरळ), छौ मुखवटा कला, दुर्गा पूजा महोत्सव (कोलकाता) यांचा यात समावेश आहे.
जागतिक वारसा यादीत दिवाळी का?
► दिवाळी हा एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पूल आहे. हा सण धर्माच्या पलीकडे जात जीवनाच्या अशा बाजूचे प्रतिबिंबित करतो जिथे प्रकाश अंधारावर विजय मिळवतो, नकारात्मकतेऐवजी सकारात्मकता आणतो आणि अराजकतेवर नवी आशा-उमेद निर्माण करत जनमानसात नवचैतन्याची बहार आणतो.
► दिवाळी ही सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येक राज्य हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करते. काही जण त्याला दीपावली म्हणतात, तर काही जण दीपोत्सव संबोधतात. कालीपूजेपासून ते बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेपर्यंत दिवाळीचे अनेक प्रकार असले तरी त्यातील भावनात्मकता एकसमान आहेत.
► दिवाळी हा आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा उत्सव आहे. पारंपरिक कारागीर, मातीचे दिवे बनवणारे, कुंभार, विणकर, मिठाई बनवणारे आणि कलाकारांसह इतर अनेक जण दिवाळीतून आपली उपजीविका करतात. हा सण भारताच्या लोककला, पारंपारिक बाजारपेठा आणि कौटुंबिक मूल्यांचे प्रतीक आहे.
► जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीय लोकांनी दिवाळीचे महत्त्व वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीयांनी दिवाळीला जागतिक उत्सव बनवले आहे. न्यूयॉर्कच्या रस्त्यांपासून ते सिडनीतील बंदरापर्यंत दिवाळी साजरी होत असल्याने महिमा वाढला आहे.
..........