For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठ खुली

10:55 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठ खुली
Advertisement

गोवा सरकार आणि ओएनडीसी यांच्यात सामंज्यस्य करार : पंतप्रधानांनी गोव्याला लाभ मिळवून दिल्याबद्दल समाधान

Advertisement

पणजी : गोवा सरकारने राज्यातील छोट्या मोठ्या उद्योग आणि व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठ खुली करण्यासाठी भारत सरकारचा उपक्रम असलेल्या ‘ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स’बरोबर (ओएनडीसी) समझोता करार केलेला आहे. ई कॉमर्स जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला असून त्याची झळ मात्र छोट्या उद्योग व्यावसायिकांना सोसावी लागत असून त्यावर मात करण्यासाठी भारत सरकारने सर्वसमावेशक अशा ई कॉमर्स सेवेची सुरुवात केली असून त्याचा लाभ आता गोव्यातील व्यावसायिकांनाही मिळणार आहे. पर्वरी येथे सचिवालयातील सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात गोवा सरकारतर्फे उद्योग खात्याच्या संचालिका कु. एगना क्लिटस आणि ओएनडीसी उपक्रमाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन नायर यांनी सामंज्यस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांची उपस्थिती होती.

छोट्या व्यावसायिकांना जागतिक लाभ

Advertisement

या करारा अंतर्गत उद्योग संचालनालय राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, छोटे मोठे व्यापारी, हस्तकारागिर, स्वयंसाहाय्य गट, शेतकरी संघ, दुग्ध व्यावसायिक, असंघटित क्षेत्रातील व्यावसायिकांच्या उत्पादनांना ई कॉमर्स सेवेचा लाभ मिळवून देणार आहे. यासाठी उद्योग संचालनालय अन्य सरकारी खाती व महामंडळाशी समन्वय साधून विविध प्रकारच्या उत्पादक आणि व्यावसायिकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणार आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या ओएनडीसी या ई कॉमर्स गोव्यातील उद्योग आणि व्यापारी वर्गाला ई कॉमर्ससाठी लागणारी माहिती, तंत्रज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य निर्माण करण्यासाठी हातभार लावणार आहे. ई कॉमर्स सुरु झाल्यामुळे उत्पादने आणि सेवांची खरेदी आणि विक्री करणे सोपे झाले आहे. लहान व्यवसाय आणि उद्योगांना त्यांचे उत्पादन प्रदर्शित करणे सोपे झाले आहे. तथापि अॅमेझॉन, प्लिपकार्टसारख्या प्रमुख ई कॉमर्स कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह बाजारपेठेवर वर्चस्व गाजवल्यामुळे संसाधने कौशल्य आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे लहान व्यवसायांसाठी या उद्योगात प्रवेश करणे आव्हानात्मक बनले आहे.

भारत सरकारचा उपक्रम

या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क किंवा ओएनडीसी हा एक आशादायक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश सक्षम ई कॉमर्सची सेवा निर्माण करण्याचा आहे. लहान उद्योग आणि व्यावसायिक ईकॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी खरेदीदार आणि विक्रेते यांना एकाच डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणण्याचे ओएनडीसीचे उद्दिष्ट आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स अर्थात ओएनडीसी हा भारत सरकारचा ई कॉमर्स खुल्या नेटवर्कद्वारे प्रवेशयोग्य बनविण्याचा एक उपक्रम आहे. ओएनडीसी हा खुल्या स्त्राsताच्या पद्धतीवर आधारित वैशिष्ट्यांचा संच आहे. हे खुल्या स्पेसिफिकेशन्स आणि नेटवर्क प्रोटोकॉलचा वापर करते जे हे सुनिश्चित करते की ते कोणत्याही एका प्लॅटफॉर्म आणि किरकोळ विक्रेते यांच्यातील मुक्त अदलाबदल आणि कनेक्शनचे पालनपोषण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

गेवा-ओएनडीसीची भागीदारी यशस्वी ठरणार : गुदिन्हो

या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्यातील उद्योग आणि व्यापाऱ्यांना ई कॉमर्स सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी गोवा सरकार आणि ओएनडीसीची भागिदारी यशस्वी मार्गक्रमण करणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाप्रकारच्या अनेक उपक्रमांना चालना दिली आणि ते यशस्वी करून दाखविले. उद्योग आणि व्यावसायिकांना सोयिस्कर आणि ग्राहकांना उपयुक्त असा हा ई कॉमर्सचा उपक्रम अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत गोव्यात राबविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारत सरकारचे गुदिन्हो यांनी आभार मानले. ओएनडीसीचा ई कॉमर्सचा उपक्रम राज्यात यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात उद्योग खात्याच्या सचिव श्रीमती स्वेतिका साचान, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापिकीय संचालक अभिषेक प्रविमल, उद्योग खात्याच्या सरव्यवस्थापक श्रीमती दर्शना नारुलकर, खादी महामंडळाचे दामोदर मोरजकर, हस्तकला खात्याच्या संचालिका संध्या कामत व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.