महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्मार्ट सिटी कामांची व्याप्ती पाहता विलंब होणे साहजिक

11:47 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिगीश यांचे मत : स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट अवश्य करावे

Advertisement

पणजी : पणजी मनपा कार्यक्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत किमान 35 प्रकल्पांची कामे सुरू आहेत. हे एक मोठे आव्हानात्मक काम आहे. सुमारे 935 कोटी खर्चाच्या या कामांची व्याप्ती पाहता विलंब होणे हे साहजिकच आहे. अशावेळी विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता संबंधित कामांची भविष्यातील उपलब्धता पाहून बोलले पाहिजे, असे मत इमेजिन पणजी स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिगीश यांनी व्यक्त केले आहे. सध्या 20 प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित 15 प्रकल्प 75 टक्के कामासह पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. त्यापैकी काही कामे येत्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होतील. अशावेळी पणजी मनपास स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करायचे असेल तर त्यांनी अवश्य करावे, त्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही रॉड्रिगीश म्हणाले. स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आजची ही पत्रकार परिषद म्हणजे आजपर्यंत जे जे कोणी ही कामे, त्यांचा दर्जा, त्यांना होणारा विलंब, त्यातील भ्रष्टाचार, यासंबंधी बोलले, टीका केली त्या सर्वांना समर्पक उत्तर मिळाले असेल, अशी अपेक्षा आपण व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत जी कामे पूर्णत्वास आलेली आहेत त्यांचा दर्जा पाहता एका वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या दोन रस्त्यांचे उदाहरण देता येईल. दोन्ही कामे उत्कृष्ट आणि दर्जेदार झाली असून वर्षभरात एक सुद्धा तक्रार आलेली नाही, यावरून त्यांचा दर्जा लक्षात येतो, असे ते म्हणाले.

Advertisement

मलनिस्सारणाचे काम आव्हानात्मक

तब्बल 70 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली मलनिस्सारण वाहिनी बदलणे हे सोपे काम नव्हे. या 70 वर्षात पणजीचा किती विकास झाला, किती इमारती आल्या, मेगा प्रकल्प आले, निवासी हॉटेल्स, दुकाने आली, लोकसंख्येत किती वाढ झाली आणि एकुणच पणजीचा किती कायापालट झाला याचा आढावा घेतल्यास मलनिस्सारण वाहिनी बदलणे ही काळाची गरज होती. त्यामुळे पूर्वीच्या केवळ 18 मिमी व्यासाच्या मलनिस्सारण वाहिनीच्या जागी 1000 मिमी व्यासाचे पाईप्स टाकण्यात येत आहेत. त्यांचे सुमारे 15 किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. त्याशिवाय गॅस पाईपलाईनही टाकण्यात येत असून आतापर्यंत 3 किमी काम पूर्ण झाले आहे. सुमारे 3 कमी लांबीचे भूमिगत फोन केबल टाकण्यात आले आहे तर वीज वाहिन्यांचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. 2.5 किमी लांबीचे फुटपाथही बांधून पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मॅनहोलला लागतात 15 दिवस

राजधानीत शेकडो ठिकाणी भूमीगत चेंबर्स (मॅनहोल्स) बांधण्यात येत आहेत. अशा एका मॅनहोलसाठी 14 जणांचा गट कार्यरत आहे आणि एक मॅनहोल पूर्ण होण्यासाठी किमान 15 दिवस लागतात. त्याशिवाय ही पाईप टाकताना खोदेल तेथे मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने त्याचा निचरा करण्यातच कितीतरी वेळ खर्च करावा लागत होते. ते एक मोठे आव्हान होते आणि त्याचा सामना करत कामे पूर्ण करावी लागली. अशा परिस्थितीत कामे पूर्ण करताना ती दिलेल्या मुदतीत पूर्ण होतीलच याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही, असे रॉड्रिगीश यांनी सांगितले.

सततच्या सोहळ्यांमुळे प्रकल्प पूर्णत्वास विलंब

गेल्या काही वर्षांपासून पणजी हे सोहळ्यांचे शहर बनले आहे. स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा असे एकामागून एक सोहळे कायम होत असतात. त्यांचाही परिणाम विकासकामे पूर्णत्वास विलंब होण्यावर होत असतो, असे एका प्रश्नावर रॉड्रिगीश यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article