बेळगाव जिल्ह्यातील तीन राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा द्या
शेट्टर यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
बेळगाव : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. बेळगाव जिल्ह्यातील तीन राज्य महामार्गांचा राष्ट्रीय महामार्गामध्ये विस्तार करावा, तसेच बेळगाव-बागलकोट महामार्गाच्या चौपदरी रस्त्यात सुधारणा करावी, यासाठी एकूण 1775 कोटी रुपये या प्रकल्पांसाठी द्यावे, अशी मागणी खासदारांनी केली. जांबोटी ते रबकवी या (राज्य महामार्ग 54) रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा व विकास करावा. यासाठी अंदाजे 815 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. रायचूर-बाची (राज्य महामार्ग-20) रस्त्याचे चौपदरीकरण करावे. यासाठी 60 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. तर संकेश्वर- हुक्केरी-घटप्रभा-गोकाक-यरगट्टी- मुनवळ्ळी- सौंदत्ती-धारवाड या मार्गाचा विस्तार राष्ट्रीय महामार्ग म्हणून चौपदरीकरण करावे. यासाठी 900 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यास मदत
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिल्यास अपघातांची संख्या कमी होणार असून वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होणार असल्याचे खासदारांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावांचा अभ्यास करून लवकरच मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन दिले.