सरकारी योजनांचा लाभ तृतीयपंथीयांना द्या
जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन
बेळगाव : तृतीयपंथीयांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी ह्युमिनिटी फौंडेशन या तृतीयपंथी जिल्हा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. संघटनेतील सदस्यांनी बुधवार दि. 26 रोजी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. राज्य सरकारच्या शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. मात्र तृतीयपंथी बसमधून प्रवास करीत असताना त्यांना शक्ती योजनेचा म्हणजेच मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येत नाही. तृतीयपंथींकडे ओळखपत्र असले तरी त्यांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागतो. सरकारच्या निवासी योजना, सामाजिक सुरक्षा यासारख्या कल्याणकारी उपक्रमांचाही तृतीयपंथीयांना लाभ मिळत नाही.
हक्क मिळविण्यासाठी तृतीयपंथीयांचा संघर्ष
तृतीयपंथीयांच्या कायदा 2019 व सर्वोच्च न्यायालयाकडून 2014 मध्ये जाहीर करण्यात आलेले हक्क मिळविण्यासाठी तृतीयपंथीयांना आजही संघर्ष करावा लागतो. बेळगाव जिल्ह्यात तृतीयपंथीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना मोलमजुरी करूनच उदरनिर्वाह चालवावा लागतो आहे. तृतीयपंथीयांना शेतीसाठी सरकारी जमीन देण्यात यावी. त्याद्वारे ते कृषी व्यवसाय करून गुजरान करू शकतील. तृतीयपंथीयांना वैयक्तिक किंवा सामूहिकपणे सरकारी जमिनी देण्यात याव्यात. शेती संबंधीचे प्रशिक्षण, सबसिडीसारख्या योजनाही राबवाव्यात. त्यामुळे तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता येईल. अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.