महाराष्ट्राच्या धर्तीवर ऊसदर द्या
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : आगामी गळीत हंगामासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातील कारखानदारांनी ऊसदर द्यावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, सर्वाधिक ऊस महाराष्ट्र राज्यात पुरवठा केला जातो. कारण, कर्नाटकातील कारखानदार उसाला योग्य भाव देत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. यामुळे राज्य सरकारने याची दखल घेऊन कारखानदारांना योग्य ऊसदर जाहीर करण्याची मागणी राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
राज्यात सर्वाधिक उसाचे उत्पादन बेळगाव जिल्ह्यात घेतले जाते. मात्र, जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऊस कारखाने असूनही कारखानदारांकडून दरवर्षी उसाला कमी भाव दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना नाईलाजास्तव महाराष्ट्रात ऊस पाठवावा लागतो. कारण, कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात उसाला जास्त दर देण्यात येतो. यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांचा ओढा महाराष्ट्रातील कारखान्यांकडे अधिक असतो. कर्नाटकातील कारखानदार आपल्या मनमानीप्रमाणे उसाला भाव देत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्ह्यातील कारखानदारांना उसाला प्रतिटन योग्य भाव देण्याची सूचना करावी. यामुळे शेतकऱ्याच्ंया मालाला चांगला भाव मिळणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासही होणार आहे. तसेच शेतकरी आनंदाने महाराष्ट्रात ऊस न पाठवता कर्नाटकातच पुरवठा करतील. यामुळे राज्याच्या विकासालाही चालना मिळणार असून शेतकऱ्यांसह राज्याच्या विकासालाही मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर कारखानदारांची बैठक घेऊन योग्य ऊसदर देण्याबाबत सूचना द्यावी.
राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढावे. यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत. राज्यातील पाणीपुरवठा योजना व रस्त्यांच्या योजनाही मार्गी लावाव्यात. बेळगाव तालुक्यातील बसुर्ते येथे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने बंधारा बांधण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहण करण्यात आली असली तरी त्यांना अद्याप भरपाई देण्यात आलेली नाही. कंत्राटदार शेतकऱ्यांना धमकी देत असून जवळजवळ शंभर ते दीडशे एकर शेती लाटण्याचा डाव आखण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. प्रशासनाने सदर बंधाऱ्याचे काम थांबविण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सुरेश परगण्णावर, राघवेंद्र नाईक, अभिनंदन चौगुले, शकुंतला तेली, वजिरप्पा बंबरगी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.