सीमाभागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्या
रमाकांत कोंडूसकर यांची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र सरकारकडून पाचवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. या परीक्षेस सीमाभागातील विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर यांनी तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. बुधवारी मुंबईच्या मंत्रालय येथे तज्ञ समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सीमावासियांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. शिवाजी विद्यापीठातील अभ्यासक्रम अनुदानित आहेत. त्यामध्ये सीमावासियांना 25 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर पीएचडीसाठी प्रवेश मिळाल्यास तीन वर्षांसाठी मोफत वसतिगृह तसेच पदवी अभ्यासक्रमासाठी 10 टक्के जागा राखीव देण्यात आल्या आहेत. याचप्रकारे उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनाही सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बेळगावसह सीमाभागातील अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला बसण्यास इच्छुक आहेत. परंतु अटींमुळे त्यांना परीक्षेला बसता येत नाही. या अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी त्यांनी तज्ञ समितीकडे केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यासह इतर उपस्थित होते.