ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत द्या
प्रतिनिधी/ बेळगाव
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये सवलत देण्यात यावी, तसेच स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाने (एआयएससीसीओएन) केली आहे. महासंघाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून उपरोक्त मागण्या केल्या आहेत.
देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या 30 लाखाहून अधिक आहे. अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघ हा राष्ट्रीय पातळीवरील मोठी संस्था आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या मागण्या अनेक दिवसांपासून आहेत. पण त्याची पूर्तता झालेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये सवलत होती. मात्र कोविड महामारीनंतर ही सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाचे पूर्ण पैसे भरून प्रवास करावा लागतो आहे.
देशात विविध मंत्रालये असून त्याद्वारे विविध खात्याच्या समस्या, मागण्या सोडविण्याला प्राधान्य मिळते. देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय नाही. त्यामुळे त्यांच्या समस्यांना, मागण्यांना मार्ग मिळत नाही, असे पत्रात म्हटले आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना पाठविलेल्या पत्रावर अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष एम. के. रैना, मुख्य सचिव श्रीहरि सिंधीया यांच्या सह्या आहेत.