सरकारी शाळांना प्राधान्य द्या
बेळगाव : ग्रामीण भागातील सरकारी शाळांना प्राधान्य देऊन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भविष्यात हीच शिक्षणसंस्था दिव्याप्रमाणे उजळत राहील. सरकार आणि जनता यांच्या समन्वयातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. कोळवी (ता. गोकाक) येथील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन करून ते बोलत होते. शाळा सुधारणा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष शिवानंद ममदापूर होते.
शाळेचा शताब्दी महोत्सव प्रत्येक गावातून झाला पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळेल. सतीश फाऊंडेशनतर्फे जिह्यातील विविध शाऴांना सुमारे 5 लाख डेस्क देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खुर्च्या, पाठ्यापुस्तके वितरित करण्यात आली आहेत. यमकनमर्डी मतदारसंघात केवळ दोन वर्षांत सुमारे 100 सरकारी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्र्यानी सांगितले. यावेळी विविध मठाधीश, कोळवी ग्राम पंचायतीचे सदस्य, शाळा सुधारणा व्यवस्थापन मंडळाचे सदस्य उपस्थित होते.