मुलांच्या हाती पुस्तकांचा खजिना द्या
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची अपेक्षा : लोकमान्य बाल ग्रंथालय-बाल सिनेमा थिएटरचे आरपीडी कॉलेजमध्ये उद्घाटन
बेळगाव : मुले वाचत नाहीत, अशी तक्रार करणाऱ्या पालकांनी प्रथम आपले वाचन किती आहे, याचे आत्मपरीक्षण करावे. आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे, त्याचाच प्रभाव मुलांवर पडतो आणि तसेच ते अनुकरण करतात. पालक सतत मालिका बघत असतील व मोबाईलमध्ये गर्क असतील तर तेच संस्कार त्यांच्या मुलांवर होतील. हलणारी दृश्ये मुलांवर परिणाम करतात. मुलांनी काय करावं, हे आपणच ठरवून त्यांच्या हाती पुस्तकांचा खजिना द्यायला हवा, अशी अपेक्षा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे एसकेई सोसायटीच्या आरपीडी व जीएसएस कॉलेजच्या आवारात लोकमान्य बाल ग्रंथालय व बाल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर शिरीष फडतरे, पर्यावरणप्रेमी डॉ. मेधा ताडपत्रीकर, अॅड. रुचिर कुलकर्णी, लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब आदी उपस्थित होते.
प्रारंभी बाल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. अॅड. रुचिर कुलकर्णी यांच्या हस्ते बाल सिनेमा थिएटरचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. मेधा ताडपत्रीकर व शिरीष फडतरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतरचा मुख्य कार्यक्रम के. एम. गिरी सभागृहात झाला. मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, आपल्या शहराचे, शहरातील मुलांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांचा विचार करणारे डॉ. किरण ठाकुर यांच्यासारखे लोकनेते या शहराला लाभले, हे खरोखरच भाग्य आहे. मुलांनी उत्तम वाचन करावे, उत्तमोत्तम चित्रपट पाहावेत यासाठी त्यांचे प्रयत्न शब्दातीत आहेत. ‘जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो, धारण करतो तोच पिता साक्षात मानावा, जन्म देई तो निमित्त केवळ’ असे म्हटले जाते, हे किरण ठाकुर यांच्या बाबतीत सार्थ ठरते. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या वाचनालयाचा, थिएटरचा मुलांनी लाभ घ्यावा व पालकांनी त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
मेधा ताडपत्रीकर यांनी मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स या डॉ. किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संस्थेची माहिती दिली. तसेच लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रम घेतले जातील, असे सांगितले. किरण ठाकुर यांच्या रुपाने एक माणूस समाजाला दिशा देत लहानांना घडवतो आहे. नव व्यावसायिकांना बळ देतो आहे, त्यांना आपण साथ देऊया, असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले, मुलांनी वाचन केले तरच त्यांची विचारकक्षा विस्तारणार आहे. मराठी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे, यासाठी आम्ही हिंदी परीक्षांप्रमाणे मराठी भाषा परीक्षा घेत आहोत. जितके सांस्कृतिक वातावरण चांगले तितके शहराचे वातावरण निकोप राहते. म्हणूनच लोकमान्य कल्चरल ग्रुपतर्फे विविध उपक्रम हाती घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
याच कार्यक्रमात ग्रंथालय व थिएटर उभारणीसाठी सहकार्य केलेले अविनाश पोतदार, किसन लाड व बाजीराव शिंदे यांचा मृणाल कुलकर्णी व डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींपैकी बकुळ जोशी काही कारणास्तव अनुपस्थित होते. प्रारंभी पंढरी परब यांनी स्वागत केले. प्रा. चारुशिला बाळीकाई आणि नमिता सामंत यांनी परिचय करून देऊन सूत्रसंचालन केले. डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. लोकमान्य सोसायटीचे पीआरओ राजू नाईक यांनी आभार मानले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.