गावातील शांतता भंग करणाऱ्यांना समज द्या
कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांची मागणी : धर्मांतर करण्याचा घाट ग्रामस्थांच्या सावधगिरीमुळे उधळला
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
येथील मरगाईनगर परिसरामध्ये एका विशिष्ट धर्माच्या नागरिकांकडून प्रार्थनेबरोबर गरजू व इतर जातीय नागरिकांना धर्मांतर करण्याचा घाट रविवारी ग्रामस्थांच्या सावधगिरीमुळे उधळून लावला. यामुळे परिसरामध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले. परंतु काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत येथे धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. परंतु त्या विशिष्ट धर्मांच्या नागरिकांनी गावातील चार-पाच तरुणांवर कारवाईची मागणी केल्यामुळे ग्रामस्थ एकवटले व गावातील शांतता भंग करणाऱ्या त्या विशिष्ट धर्माच्या नागरिकांना समज देऊन त्यांच्या घराचे सर्व परवाने रद्द करण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांना दिलासा देण्याचे निवेदन ग्राम पं. अध्यक्षा, उपाध्यक्षा, पीडीओ, सदस्यांना गुरुवारी देण्यात आले.
येथे अनेक जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशा सुसंस्कृत गावामध्ये मरगाईनगर भागात एका विशिष्ट धर्माच्या लोकांकडून गरजू नागरिकांचे धर्मांतर करत असल्याची बातमी गावामध्ये पसरली. यामध्ये होनगा, काकती, गणेशपूर येथील नागरिक असल्याचेही समजले. यामुळे नागरिक एकवटले आणि धर्मांतराचा डाव उधळून लावला. परंतु या विशिष्ट धर्माच्या लोकांकडून गावातील शांतता भंग करण्याचे कृत्य होत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचीही मागणी यावेळी केली. निवेदन देण्यापूर्वी निवेदनातील मजकूर ग्रामस्थांना वाचून दाखविला. 2020 सालीही प्रार्थनेच्या नावाखाली असाच धर्मांतराचा प्रकार घडला होता असे सांगितले. तेव्हा ग्राम पंचायतने गांभीर्याने लक्ष देवून त्यांना समज देवून परत असे प्रकार होवू नयेत तसेच असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून गावातील शांतता कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली.
व्हायरल व्हिडीओ चुकीचा
धर्मांतराचा डाव उधळून लावल्यानंतर त्या विशिष्ट धर्माच्या नागरिकांनी गावातील तरुणांनी आपल्या घरावर दगडफेक केली. जाळपोळ केली, आम्हाला धमकी दिली तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना गुंड म्हणून शब्द वापरला आहे. हे साफ खोटे आहे. कारण आता आपला डाव आपल्यावरच उलटणार या भीतीपोटी व्हिडीओ व्हायरल करून परत त्यांना गावातील शांतता भंग करण्याचे कृत्य केल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.
शांतता राखण्याचे आवाहन
ग्राम पं. कार्यालयातील शांतता बैठकीमध्ये काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंगे म्हणाले, आम्ही कोणत्याही जाती, धर्माच्या नागरिकांवर अन्याय झाल्यास कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो. गावच्या शांततेच्या दृष्टीने त्यांनी केलेले कृत्य चुकीचे असल्यास त्यांना योग्य शासन करतो. असे सांगून सर्वांना शांततेचे आवाहन केले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, तालुकाप्रमुख कल्लाप्पा पाटील, गो-सेवा प्रमुख हिरामणी मुचंडीकर, श्रीराम सेना तालुका प्रमुख भरत पाटील, बजरंग दल तालुका प्रमुख भावकाण्णा लोहार, कंग्राळी खुर्द ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटीलसह कंग्राळी बुद्रुक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धारकरी, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रा.पं.ला ग्रामस्थांकडून चार दिवसांचा अल्टिमेट
2020 पासून सदर प्रकार गाजत असून, सध्या न्यायालयात प्रकरण सुरू आहे. यामुळे या ठिकाणी गावातील शांतता भंग होईल, असे कोणीही कृत्य करणे चुकीचे आहे. परंतु ग्राम पंचायतीचे सारे नियम धाब्यावर बसवून हे नागरिक प्राथना करणे, धर्मांतर करणे हे उघड असल्यामुळे येत्या चार दिवसांत त्यांच्या घरांचा अनधिकृत परवाना, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा बंद झालाच पाहिजे. नाही तर बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदु संघटना रस्त्यावर उतरतील, असा सबुरीचा सल्लाही उपस्थित ग्रामस्थ हिंदू संघटनांकडून देण्यात आला.