मुलींनी स्वावलंबी जीवन जगावे
डॉ. प्रभाकर कोरे यांचे मत : सुभाषनगर येथे निर्माण करण्यात आलेले वसतिगृह विद्यार्थिनींना सुपूर्द
बेळगाव : विद्यार्थिनींनी औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम शिकून उज्ज्वल भविष्य घडवावे. आज वैद्यकीय व तांत्रिक क्षेत्रात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अशा अभ्यासक्रमांमुळे मुली स्वावलंबी जीवन जगू शकतात. महात्मा बसवेश्वर यांच्या तत्त्वांचे पालन करून आपले जीवन जगावे, असे प्रतिपादन वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. सुभाषनगर येथील अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्यावतीने मुलींसाठी मोफत वसतिगृह निर्माण करण्यात आले आहे.
हे वसतिगृह मुलींसाठी सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी 60 विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. कोरे पुढे म्हणाले, बेळगाव शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजातील विद्यार्थिनींसाठी मोफत वसतिगृह निर्माण करण्याचे स्वप्न जुने होते. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या सहकार्याने व अनेक देणगीदारांच्या मदतीने सुभाषनगर येथे जागा घेऊन सुसज्ज असे वसतिगृह निर्माण केले आहे. आज हे वसतिगृह विद्यार्थिनींना सुपूर्द करताना आनंद होत आहे, असे सांगितले. विद्यार्थिनींना वसतिगृहात कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी सदैव तत्पर राहू.
विद्यार्थिनींनीही समस्या असल्यास नि:संकोचपणे तक्रार करावी. गरिबी प्रत्येकासाठी असतेच. पण आपले ध्येय साध्य करण्यासाठी सदैव पुढील वाटचाल करत राहावी. प्रत्येक संकटावर मात करत अपयश आले तरी अखंडित प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घ्यावे. शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून स्वावलंबी जीवन जगावे, असे कोरे म्हणाले. ज्येष्ठ वकील एम. बी. जिरली यांनी, आपल्या समाजाने मुलींना शिक्षण घेण्यासाठी सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सदर वसतिगृहाचा विद्यार्थिनींनी सदुपयोग करून घ्यावा.
डॉ. गुरुदेवी हुलेप्पण्णावरमठ यांनी, डॉ. प्रभाकर कोरे यांचे वीरशैव लिंगायत समुदायासाठी मोठे योगदान आहे. गरीब मुलींना शिक्षणासह निवारा देण्याचा त्यांचा संकल्प आज पूर्ण झाला आहे. रत्नप्रभा बेला यांनी विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या नियमांचे उल्लंघन करू नये. आपल्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करून पालकांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन त्यांनी केले. रविशंकर भूपलापूरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आशा कोरे, ज्योती बदामी, रमेश कळसन्नवर, सोमलिंग माविनकट्टी, एम. वाय. मेणसीकायी, भालचंद्र बागी, उमेश बाळी यांच्यासह महासभेचे पदाधिकारी, विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते. आशा यमकनमर्डी यांनी आभार मानले.