गिलला कसोटी कर्णधारपदी दीर्घकाळ संधी द्यावी : पाँटिंग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शुभमन गिलकडे कसोटी संघाची सूत्रे सोपवून भारताने योग्य निर्णय घेतला आहे आणि आता या तऊण खेळाडूला त्याची क्षमता सिद्ध करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल, असे रिकी पाँटिंग यांनी म्हटले आहे. पाँटिंग यांना विश्वास आहे की, भारत इतर देशांपेक्षा संक्रमणाचा टप्पा जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकेल. गिलला कर्णधारपदी दीर्घकाळ संधी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
20 जूनपासून इंग्लंडचा पाच कसोटी सामन्यांचा दौरा सुरू करताना भारताला विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्याशिवाय खेळावे लागेल. कोहली आणि रोहित गेल्या महिन्यात कसोटीतून निवृत्त झाले आहेत, तर अश्विनने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान निवृत्ती घेतली होती आणि शमीला फिटनेसच्या कारणास्तव संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
मला खरेच वाटते की, हा योग्य निर्णय आहे. मला माहिती आहे की, बरेच लोक, तज्ञ बुमराहची निवड न करता शुभमनला का पसंत केले गेले ते समजत नाही, असे म्हणत आहेत. पण मला वाटते की, हे अगदी सोपे आहे. बुमराह दुखापतींमुळे गेल्या काही वर्षांत थोडा मागे पडला आहे आणि कर्णधाराच्या बाबतीत अशा समस्या नको असतात. तुमच्याकडे असा कर्णधार येऊ शकत नाही जो अधूनमधून सामने चुकवेल. म्हणून मला वाटते की, हा योग्य निर्णय आहे. आता त्यांना गिलसोबत राहावे लागेल आणि त्याला दीर्घकाळ संधी द्यावी लागेल, असे मत पाँटिंग यांनी व्यक्त केले आहे.
भारत इतर कोणत्याही कसोटी खेळणाऱ्या संघापेक्षा संक्रमणाचा टप्पा चांगल्या प्रकारे हाताळू शकेल. जे इतके दिवस खेळले आहेत आणि इतके कसोटी क्रिकेट खेळले आहेत अशा खेळाडूंना बदलणे नेहमीच खूप कठीण असते. पण जर कोणताही देश ते करू शकतो आणि लवकर करू शकतो, तर तो भारत आहे. कारण त्यांच्याकडे युवा प्रतिभा आहे, असेही पाँटिग यांनी म्हटले आहे.