गिल, रोहितचे वनडेतील अव्वल दोन स्थाने कायम
वृत्तसंस्था/ ► दुबई,
भारतीय फलंदाज शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दोन स्थानावर कायम आहेत आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. मॅके येथे नुकत्याच झालेल्या मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मोठी प्रगती केली असली तरीगिल (784 रेटिंग गुण) आणि रोहित (756) यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम राहिले आहे तर पाकिस्तानचा बाबर आझम (739) तिसऱ्या क्रमांकांवर आहे.
कोहलीचे 736 गुण आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाने एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत, परंतु गोलंदाजांच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत कुलदीप यादव (650) आणि रवींद्र जडेजा (616) अजूनही तिसऱ्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. रोहित आणि कोहलीने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, दोघेही एकदिवसीय स्वरूपात सक्रिय आहेत. रोहित आणि कोहली दोघांनीही फेब्रुवारी 2025 मध्ये युएईमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, जिथे त्यांनी भारताच्या विजेतेपदाच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.