गिल, जैस्वाल, साई सुदर्शनकडून जाळ्यात जोरदार सराव
वृत्तसंस्था/ कोलकाता
लहान स्वरूपातील क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटच्या कठोर स्वरूपाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार शुभमन गिलने मंगळवारी जाळ्यात सराव करताना जवळजवळ दीड तास घालवला. शुक्रवारपासून येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी तंत्र सुधारण्यावर त्याने लक्ष केंद्रीत केले आहे.
गेल्या महिन्यात आव्हानात्मक परिस्थितीत पाकिस्तानमध्ये 1-1 अशी बरोबरी साधल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविऊद्धच्या दोन घरच्या कसोटी सामन्यांत अर्धशतक आणि नाबाद शतक झळकावणाऱ्या गिलला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये त्याला एकदाच अर्धशतकाच्या जवळ पोहोचता येऊन कॅरारा ओव्हल येथे त्याने 46 धावा काढल्या. आता पुन्हा एकदा कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या गिलने जाळ्यात दृढनिश्चयाने फलंदाजी केली आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गमावलेली लय परत मिळविण्यास तो उत्सुक दिसत होता. जाळ्यात सराव करण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि साहाय्यक प्रशिक्षक सीतांशू कोटक हायकोर्ट एंडजवळ त्याच्याशी दीर्घ गप्पा मारताना दिसले.
गिल नंतर त्याच्या सहकाऱ्यांसह क्षेत्ररक्षणाच्या सरावात सामील झाला आणि नंतर यशस्वी जैस्वालसोबत फलंदाजीचा जोरदार सराव केला. फिरकीपासून सुऊवात करून त्याने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा सामना केला. बहुतेकदा जमिनीवरून जाणारे फटके त्याने हाणले आणि अधूनमधून स्वीप केला. वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत त्याने नितीशकुमार रे•ाrचा सामना केला. रे•ाrने काही स्थानिक क्लब गोलंदाजांसोबत गोलंदाजी करताना चेंडू कट व स्वींग करून गिलच्या कौशल्याची चाचणी घेतली. त्यानंतर एका सपोर्ट स्टाफ सदस्याने उंचावरून थ्रोडाऊन देण्यासाठी साइडआर्मचा वापर केला, ज्यामुळे गिलला अतिरिक्त उसळी आणि वेग यांचा सराव मिळाला. साईड नेटमध्ये एक तासापेक्षा जास्त काळ खेळल्यानंतर तो गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या देखरेखीखाली आणखी 30 मिनिटे थ्रोडाऊनला सामोरे जाण्यासाठी मधल्या खेळपट्टीवर गेला.
रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानसाठी 67 आणि 156 धावा काढलेल्या जैस्वालने मधल्या खेळपट्टीवर मॉर्केलचा सामना करत आणि थ्रोडाऊन घेत बराच काळ सराव केला. हा डावखुरा फलंदाज अस्खलितपणे ड्राईव्ह हाणताना आणि आत्मविश्वासाने फटके खेळताना दिसला. जाळ्यातील सरावात लक्षणीय वेळ घालवणारा आणखी एक फलंदाज म्हणजे साई सुदर्शन होता. त्याला दक्षिण आफ्रिका ’अ’विऊद्ध भारत ’अ’ संघाकडून दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये फक्त 84 धावा करता आल्या. संघ व्यवस्थापन त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठिंबा देत आहे, मात्र तो अद्यापही त्या स्थानावर छाप उमटवू शकलेला नाही. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविऊद्ध 61 आणि घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविऊद्ध 87 धावा हीच त्याची कसोटीमधील लक्षणे कामगिरी राहिलेली आहे.
बेंगळूरमध्ये रविवारी संपलेल्या ’अ’ संघाच्या आव्हानात्मक मालिकेनंतर फक्त एक दिवस आधी संघात सामील झालेले त्याचे भारत ’अ’ संघातील सहकारी के. एल. राहुल, जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज हे या ऐच्छिक सराव सत्राला हजर राहिले नाहीत. परंतु साईने तसा ब्रेक घेतला नाही आणि पूर्ण तीव्रतेने फलंदाजी केली. वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाजांचा त्याने सामना केला आणि मधल्या खेळपट्टीवर थ्रोडाऊन घेतले. तिसरे स्थान हे सध्या चर्चेचा विषय राहिले आहे, कारण ध्रुव जुरेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशीही अटकळ आहे की, जुरेल शुद्ध फलंदाज म्हणून खेळू शकतो. कारण रिषभ पंत दुखापतीतून बरा झाल्यानंतर यष्टीरक्षक म्हणून परतणार आहे. कसोटीत 47.77 अशी सरासरी असलेला आणि वेस्ट इंडिजविऊद्ध पहिले शतक झळकावणारा जुरेल प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये राहिला आहे. त्याने गेल्या पाच सामन्यांत तीन शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका ‘अ’विऊद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने दोन शतके झळकावली
वेगवान गोलंदाजांमध्ये फक्त जसप्रीत बुमराहने सराव केला. सुमारे 15 मिनिटे त्याने दोन यष्ट्यांवर रोख ठेवून गोलंदाजी केली आणि खास करून ऑफ स्टंपला लक्ष्य केले. आरामदायी मूडमध्ये त्याने थोडी फलंदाजी देखील केली आणि सहकाऱ्यांशी संवाद साधण्यात वेळ घालवला. बुमराहच्या उजव्या गुडघ्यावर पट्टी बांधलेली होती. त्याने गंभीर आणि मॉर्केलच्या देखरेखीखाली गोलंदाजी केली.