मांडवीत येणार महाकाय कॅसिनो बोट
मांडवी नदीत मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता
पणजी /विशेष प्रतिनिधी
मांडवी नदीमध्ये पणजीत कॅसिनोंची आतापर्यंतची सर्वात मोठी बोट लवकरच दाखल होणार आहे. सदर बोट सात मजली असून तिची लांबी 112 मीटर आहे. या संदभृ मिळालेल्या माहितीनुसार मांडवी नदीमध्ये सध्या पाच कॅसिनोच्या बोटी आहेत. त्यातील डेल्टिन या कंपनीची बोट सध्या चार मजली असून ती 70 मीटरची आहे. दक्षिण भारतात नव्याने सात मजली उंचीची अति भव्य अशी बोट उभारली असून ती लवकरच गोव्यात पोहोचणार आहे. या बोटीची क्षमता सध्याच्या कॅसिनो ची डेल्टा याच्या बोटीपेक्षा चार पटीने जादा आहे.
मांडवीमध्ये सध्या खनिज वाहतूक करणाऱ्या बार्जेसचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र ही नवीन महाकाय बोट सुरू झाल्यानंतर आणि त्याचवेळी बार्जेसद्वारे खनिज वाहतूक सुरू झाली तर फार मोठी गंभीर समस्या मांडवी नदीत निर्माण होऊ शकते. गोवा सरकारच्या आशीर्वादानेच ही मोठी बोट मांडवी नदीमध्ये येऊन उभी राहणार आहे. प्राप्त माहितीनुसार गृह मंत्रालयाने देखील या बोटीला परवानगी दिली आहे. डेल्टा या कंपनीने हे नवीन जहाज आणल्यानंतर इतर कंपन्या देखील अशाच पद्धतीची मोठी जहाजे आणतील, त्यामुळे पणजीतून बेतीची बाजू दिसणे मुश्किल होऊन जाणार आहे.