आईस्क्रीममधली ‘भुताटकी’
माणसे त्यांच्या डोक्यांमधून कोणत्या कल्पना बाहेर काढतील आणि त्या कशा क्रियान्वित करतील, याचे अनुमान काढणेही कठीण आहे. विशेषत: व्यापार क्षेत्रात आपला माल खपविण्यासाठी सातत्याने भन्नाट कल्पना आचरणात आणल्या जातात. जाहीरातीचे क्षेत्र तर अशा अचाट कल्पनांवरच चालते. मात्र, एका आईस्क्रीम विव्रेत्याने आपले आईस्क्रीम लोकप्रिय करण्यासाठी जे तंत्र उपयोगात आणले आहे, ते पाहून आपल्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना प्रांतात हे आईस्क्रीम विक्री केंद्र आहे. त्याच्या चालकाने असे आईस्क्रीम तयार केले आहे की ज्यात डोकावून पाहिले असता बालकांचे भीतीदायक चेहरे दिसतात. या आईस्क्रीमचा वरचा थर नेहमीप्रमाणेच आहे. पण त्याच्या खाली बालकांच्या मुंडक्यांच्या आकाराचे आईस्क्रीमचे तुकडे आढळतात. शिवाय या मुंडक्यांचे स्वरुप इतके भेसूर आहे की जणू काही ती भुतांची बालकेच वाटावीत. असे आईस्क्रीम पाहून ते खावेसे न वाटता त्याला घाबरावेसे वाटले तर काहीही आश्चर्य नाही. अनेक लोक तसे घाबरतातही.
तथापि, आईस्क्रीममधली ही कृत्रिम ‘भुताटकी’ अनेक आईस्क्रीमप्रेमींना आवडते, असा या केंद्राच्या चालकाचा अनुभव आहे. त्यामुळे त्याने हा नवा प्रयोग सुरुच ठेवला आहे. या आईस्क्रीमची छायाचित्रे प्रसिद्ध करुन त्याने त्याची जाहीरातही मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याच्या या कल्पनेला प्रतिसादही मोठा मिळत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. भुताटकीचे आईस्क्रीम खाण्यासाठी त्याच्या दुकानी मोठी गर्दी होते. त्यामुळे आता त्याने वेगवेगळ्या चवीची, स्वादाची आणि रंगांची ‘भुताटकी आईस्क्रीम्स’ ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केली आहेत.