दोघा संशयित घरफोड्यांना घटप्रभा पोलिसांकडून अटक
3 लाखांच्या दागिन्यांसह मोटारसायकल जप्त
बेळगाव : चोरी प्रकरणातील दोघा संशयितांना अटक करून घटप्रभा पोलिसांनी त्यांच्याजवळून 3 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व एक मोटारसायकल जप्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. गोकाकचे पोलीस उपअधीक्षक डी. एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली घटप्रभाचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला, उपनिरीक्षक एच. के. नरळे, एम. व्ही. मुरनाळ व एम. एम. देवडी, आर. के. होळकर, आर. के. धुमाळे, बी. एस. नाईक, आर. आर. गिड्डाप्पगोळ, बी. एम. तळवार आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. हणमंत बजंत्री, हालाप्पा वालीकार दोघेही राहणार गोकाक अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सुमारे 3 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांबरोबरच मोटारसायकल जप्त करणाऱ्या पोलीस पथकाचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले आहे.