घरफाळा विभागाची 44 कोटींची वसूली
कोल्हापूर :
महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून गेल्या 9 महिन्यात केवळ 44 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरीत दोन महिन्यांमध्ये 56 कोटी रुपयांच्या वसुलीचे आवाहन घरफाळा विभागास पेलावे लागणार आहे. वसुलीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेच्या विविध सुविधांचा आणि विकास कामांचा गाडा विविध करातून जमा होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून जमा उत्पन्न व होणारा खर्च यांचा मेळ बसत नाही आहे. यामुळे शासन योजना, निधी सोडला तर महापालिकेला स्वनिधीतून काही खर्च करायचा झाल्यास सारासार विचार करावा लागत आहे. याशिवाय कर्मच्रायांच्या आर्थिक मागण्यांबाबतही निर्णय घ्यावे लागत आहेत. या स्रायांमुळे महापालिकेच्या तिजोरीला विविध करातून येणाऱ्या उत्पन्नाचा मोठा आधार असतो. गतवर्षी 510 कोटींच्या आसपास उद्दिष्ट असताना 465 कोटींची वसुली झाली. वर्षअखेरीस 45 कोटींची तूट होती. 2024 - 25 चे अंदाजपत्रक करताना 588 कोटी रुपयांचे उद्दिष्ट महापालिकेच्या विविध विभागांना देण्यात आले आहे. मात्र या वसुलीकडे विविध विभागांकडून कानाडोळा केल्याचे दिसत होते. यानंतर प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी विविध विभागांचा आढावा घेवून, अधिकाऱ्यांना वसुलीबाबत सक्त सुचना दिल्या होत्या. काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. यानंतर वसुलीला काहीसा वेग आला. मात्र अद्यापही वसुली टार्गेटच्या 50 टक्क्यापर्यंत पोहोचलेली दिसत नाही. घराफाळा विभागाकडून 1 एप्रिल 2024 ते 10 जानेवारी 2025 अखेर 89 हजार 988 मिळकतधारकांकडून 44 कोटी 29 लाख 86,04 रुपयांचा घरफाळा वसुल करण्यात आला आहे. मात्र ही रक्कम एकूण उद्दीष्टाच्या केवण् 44 टक्के इतकीच आहे. उर्वरीत दोन महिन्यांमध्ये 56 टक्के वसुलीचे टार्गेट घरफाळा विभागास पुर्ण करावे लागणार आहे.