For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजेंदर सिंगकडून घानाचा सुली ‘नॉकआऊट’

06:00 AM Aug 19, 2022 IST | Tarun Bharat Portal
विजेंदर सिंगकडून घानाचा सुली  ‘नॉकआऊट’
Advertisement

दुसऱयाच फेरीत केली मात, प्रो बॉक्सिंगमधील तेरावा विजय

Advertisement

वृत्तसंस्था /रायपूर

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग पुन्हा विजयपथावर परतला असून बुधवारी रात्री येथे झालेल्या लढतीत घानाच्या इलियासू सुलीवर नॉकआऊट विजय मिळविला.

Advertisement

बॉक्सिंगमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवून देणाऱया विजेंदरने व्यावसायिक क्षेत्रातील आपला दर्जा दाखवून देताना सुलीवर पूर्ण वर्चस्व राखले. त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की सहा फेऱयांच्या या लढतीत दुसऱया फेरीतच त्याने सुलीला जोरदार फटक्यावर नॉकआऊट केले. सुली हा पश्चिम आफ्रिका युनियनचा चॅम्पियन आहे. 36 वर्षीय विजेंदरने केवळ पाच मिनिटे 7 सेकंदात सुलीचे आव्हान संपुष्टात आणले. आतापर्यंत शंभर टक्के विजयाचे रेकॉर्ड असणाऱया सुलीचा हा पहिला पराभव आहे तर प्रो बॉक्सिंगमधील विजेंदरचा हा 13 वा विजय असून व्यावसायिक स्तरावर त्याचा एकमेव पराभव मागील वर्षी मार्चमध्ये रशियाच्या आर्टीश लॉप्सनकडून झाला होता.

‘पुन्हा विजयपथावर आल्याचा आनंद होतोय. मोसमाची सुरुवात विजयाने केली असली तर सुलीविरुद्धची ही लढत सोपी नव्हती. आता आठवडाभरात पुढच्या लढतीच्या तयारीला लागणार असून येत्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मी पुन्हा लढणार आहे,’ असे विजेंदर विजयानंतर म्हणाला.

सिद्धू मुसेवालाचे ‘सो हाय’ या गाण्याच्या तालावर तो रिंगणात उतरला तेव्हा त्याच्यात आत्मविश्वास ओसंडून वाहत असल्याचे त्याच्या देहबोलीवरून दिसून आले. त्याने या लढतीत लांब हातांचा व स्ट्रेट जॅब्सचा परिणामकारक वापर करीत सुलीवर दडपण आणले तेव्हा चाहते बरेच खुष झाले होते. त्याने प्रभावी पंचेसचे मिश्रण करीत काम फत्ते केले आणि तांत्रिकदृष्टय़ाही विजेंदर सुलीपेक्षा सरस असल्याचे दिसून आले.

दुसऱया राऊंडमध्ये विजेंदरने प्रतिआक्रमण करण्यावर भर देत सुलीला आक्रमण करण्याची संधी दिली होती. पण सुलीला विजेंदरच्या ठोशांच्या भडिमाराला प्रत्युत्तर देता न आल्याने तो खाली पडला आणि पहिले काऊंटिंग सुरू झाले. त्यानंतर विजेंदरने स्ट्रेट जॅब्स, हुक्स व अपर कट्स फटक्यांची मालिकाच सुरू करीत सुलीच्या प्रतिकारातील हवा काढून घेतली. रोपचा आधार घेतला असताना विजेंदरने आणखी एक जोरदार हुकचा फटका मारत सुलीचे आव्हान संपवले.

अन्य लढतीत आसद असिफ खानने फेदरवेट गटात अमेय नितीनचा पराभव केला तर आशिष शर्माला लाईटवेट गटात कार्तिक सतीश कुमारकडून पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय गुरप्रीत सिंगने निर्विवाद निकाल मिळविताना सायखोम रेबाल्डोवर मात केली तर फैझान अन्वरने वेल्टरवेट गटात सचिन नौटियालवर नॉकआऊट विजय मिळविला.

Advertisement
Tags :

.