बांधकाम कामगारांच्या योजनांचा लाभ मिळवून द्या
बांधकाम कामगार संघटनेची कामगार आयुक्तालयाकडे मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बांधकाम व मनरेगा कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही कामगारांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत कपात करण्यात आली आहे. तसेच विविध योजनांसाठी अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे लाभार्थ्यांचे अर्ज थेट स्वीकारले जावेत, अशी मागणी बेळगाव जिल्हा बांधकाम संघटनेच्यावतीने कामगार आयुक्तालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शुक्रवारी अॅड. एन. आर. लातूर यांच्या अध्यक्षतेखाली कामगार आयुक्तालयाचे अधिकारी राजेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. पदवीपूर्व व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या प्रत्येक मुलाला लॅपटॉप खरेदीसाठी 50 हजार रुपये अनुदान द्यावे. फ्लॅट खरेदी व घर बांधणीसाठी 5 लाख रुपयांचे अनुदान द्यावे. मनरेगा कामगारांना कामगारांची रद्द करण्यात आलेली पात्रता पुन्हा लागू करावी. कामगार सेवा केंद्र स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन बेंगळूर येथील कामगार आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.यावेळी संघटनेचे राहुल पाटील, रमेश काकतीकर, प्रशांत हेरेकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.