रस्त्यावर थुंकणाऱ्यांचा माज उतरवा!
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
रस्त्यावर कोणी थुंकले किंवा कचरा टाकला आणि त्यावेळी आपण त्याच्याकडे थोड्या नाराजीने पाहिले तरी त्यांना राग येतो. रस्ता काय तुमच्या बापाचा आहे काय? असाच प्रश्न विचारणारा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो. रस्त्यावर थुंकल्याचे किंवा कचरा टाकल्याचे त्याला काहीही चुकीचे वाटत नाही. उलट पुन्हा पचकन् थुंकून तो पुढे जातो. आपणही फारशी लांबड लावत नाही. त्यामुळेच असा रस्त्यावर बिनधास्त थुंकणाऱ्यांचा माज वाढल्याशिवाय राहत नाही आणि सर्वसामान्य माणसाला त्याची कितीही घाण वाटली, संताप आला तरी तो फक्त बघत बसण्याशिवाय काही करू शकत नाही.
रस्त्यावर थुंकू नये, असा नियम असला तरीही रस्त्यावर पचापच थुंकल्याशिवाय अनेक जण राहत नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे. राजारामपुरीत दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर बिनधास्त ठोकणाऱ्यावर कारवाई झाली, ती देखील एका सतर्क नागरिकांमुळे झाली. कारण रस्त्यावर थुंकू नको, असे म्हणताच त्या तरुणांनी नागरिकाला सोट्याने मारहाण केली. काय करायचे ते कर, असा दम दिला. अर्थात हा ‘दम’ त्यालाच काही वेळाने भारी पडला. पोलीस तक्रारीनंतर पोलिसांनी द्यायचा तो ‘प्रसाद’ त्या तरुणाला दिला आणि काय करायचे ते कर, असा दम देणारा तो तरुण हातापाया पडून मी पुन्हा रस्त्यावर थुंकणार नाही, असे म्हणू लागला. पण हे झाले एका नागरिकाने धाडसाने पाठपुरावा केल्यामुळे.

वास्तवात मात्र चित्र खूप वेगळे आहे. रस्त्यावर थुंकणे ही केवळ घाणच नाही, पण रोगराई पसरवण्याचा अतिशय गंभीर प्रकार आहे. क्षय रुग्ण असेल आणि तो रस्त्यावर कोठेही थुंकत असेल तर त्यामुळे क्षय पसरण्याचा धोका 100 टक्के आहे. शासकीय तरतुदीनुसार हा गुन्हा आहेच. त्याला कमीत कमी 200 रुपये दंड आहे. तंबाखू नियंत्रण मंडळ म्हणून समिती आहे. या समितीने शासकीय सार्वजनिक ठिकाणी फिरून रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर जाग्यावरच दंड करायची तरतूद आहे. त्या समितीत पोलीस, अन्नसुरक्षा विभागाचे सदस्य आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीत ही समिती असते. या समितीने जागरूकतेबरोबरच थेट कारवाई करायची असते. या समितीने केलेल्या कारवाईची संख्या पाहिली तर कोल्हापुरात एकही माणूस रस्त्यावर थुंकत नाही, असे वाटण्यासारखी ‘परिस्थिती’ आहे. या पार्श्वभूमीवर फक्त मावा विकणाऱ्या ठराविक सेंटरसमोर पाच मिनिटे जरी हे पथक थांबले तर एकावेळी तोंडात माव्याचा तोबरा भरलेले 25-30 जण सहज दिसतील, अशी कोल्हापुरातली परिस्थिती आहे.
जास्त गाजावाजा होऊ नये म्हणून किंवा, त्यापेक्षा येथे मावा मिळतो, हे तरुणांना कळावे म्हणून त्यांनी आपल्या दुकानावर खास पडदे लावले आहेत. त्या पडद्याआडच हाच नशेबाज मावा विक्रीचा आणि पचापच थुंकण्याचा धंदा कोल्हापुरात ठीक ठिकाणी सुरू आहे. हा मावा खाल्ला की डोक्यात कीक बसते. मावा खाऊ नका, कॅन्सर होतो, असे शहाणपण शिकवणाऱ्याला खाडकन् थप्पड मारण्याचे धाडस या मावा शौकिनांत यामुळे हमखास येते. कोल्हापुरात अशी मावा विक्रीची ठिकाणी उघड सुरू आहेत. बिनधास्त मावा विक्री सुरू आहे. आणि मावा गिळायचा असतो तर तो थुंकायचा असतो. त्यामुळे मावा विक्री करणाऱ्या सेंटरसमोरील रस्ते अक्षरश: लालसर चॉकलेटी थुंकीने रंगलेले आहेत. मावा विकणाऱ्याला कारवाईची भीती अगदी शून्य आहे. असल्या नशेबाज मावा विक्रीतून मिळालेल्या पैशावर मंडळांना देणग्या देऊन त्यांनी आपल्या मागे तरुणाईची ताकद उभी केली आहे. पण प्रत्यक्षात माव्याचे व्यसन लावून ते पिढीच्या पिढी बाद करत चालले आहेत.
कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी अशाच माव्याच्या नशेतील तरुणांनी एका सभ्य नागरिकाला ठोकले आहे. तो नागरिक थोडा धाडसी होता, म्हणून त्यांनी हे प्रकरण तडीस लावून मारणाऱ्या तरुणाला पोलिसी खाक्या दाखवला आहे. पण प्रत्येकाला हे अशक्य आहे. त्यामुळे मावा खाऊन रस्ता माझा नाही तर माझ्या बापाचा, असे म्हणत थुंकणाऱ्यांची भिड आणखी चेपणार आहे. त्यामुळे अख्ख्या कोल्हापूरला माहीत असलेली भरवस्तीतली मावा विक्री पहिल्यांदा बंद होणे गरजेचे आहे. कारण मावा खाऊन थुंकले की रस्ता घाण होतो. तो रस्ता एक वेळेस स्वच्छ करणे शक्य आहे. पण मावा खाऊन तरुणाला कॅन्सरने गाठले तर त्या तरुणाचे आयुष्य मात्र नक्कीच संपणार आहे.