जर्मनीचे दरवाजे सीरीयन्ससाठी बंद
वृत्तसंस्था / बर्लिन
सीरीयात सध्या अशांत परिस्थिती असल्याने तेथील अनेक नागरीकांनी जर्मनीत आश्रय मिळावा म्हणून प्रयत्न चालविला आहे. तथापि, अशा आश्रयेच्छूंना आपले दरवाजे बंद करण्याचा निर्णय जर्मनीने घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही आश्रयेच्छूचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे त्या देशाने स्पष्ट केले आहे.
जर्मनीने आपले दरवाजे उघडल्यास किमान 3 लाख सीरीयन नागरीक त्या देशात स्थलांतरित म्हणून येण्याची शक्यता आहे. आधीच या देशात मुस्लीम देशांमधून अनेक लक्षावधींच्या संख्येने स्थलांतरीत घुसल्याने तेथे अनेक सामाजिक, कायदाविषयक आणि आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. तशातच जर्मनीची अर्थव्यवस्थाही गेली काही वर्षे मंदीच्या जाळ्यात अडकल्याने त्या देशाची कोंडी झाली आहे. अशा स्थितीत सीरीयाहून येणाऱ्या स्थलांतरीतांची आणि आश्रयेच्छूंची भर पडल्यास जर्मनीची अंतर्गत व्यवस्था कोलमडून जाईल, असा इशारा तेथील काही राजकीय पक्षांनी दिला आहे. त्यामुळे जर्मनीने हा निर्णय घेतला आहे.