दक्षिण आफ्रिकेला 4-0 नमवून जर्मनीची दमदार सुरुवात
वृत्तसंस्था/ मदुराई
गतविजेत्या जर्मनीने शुक्रवारी येथे त्यांच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-0 असा पराभव करून एफआयएच पुऊष कनिष्ठ हॉकी विश्वचषक मोहिमेची सुऊवात दमदारपणे केली. सात वेळा विजेत्या जर्मनीसाठी जस्टस वॉरवेगने दोन गोल केले. 19 व्या आणि 56 व्या मिनिटाला त्याने मैदानी गोल केले, तर बेन हॅसबॅक (43 व्या मिनिटाला) आणि पॉल ग्लँडर (44 व्या मिनिटाला) यांनी दोन पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये रुपांतरित केले.
दुसरीकडे, गट ‘अ’च्या पहिल्या सामन्यात आयर्लंडने एका रोमांचक लढतीत कॅनडाचा 4-3 असा पराभव केला. लुई रोच्या प्रयत्नांतून 13 व्या मिनिटाला आयर्लंडने मैदानी गोल करून आघाडी घेतली. कॅनडाने 26 व्या मिनिटाला गुमूर भुल्लरच्या मैदानी गोलद्वारे बरोबरी साधली. रोने 33 व्या मिनिटाला आणखी एक उत्तम मैदानी गोल केला. त्यानंतर ग्रेगरी विल्यम्सने 35 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर रूपांतरित करून आयर्लंडसाठी 3-1 अशी आघाडी वाढविली. मिलो थॉम्पसनने आणखी एक प्रभावी मैदानी गोल करून या आघाडीत भर घातली.
पण 1-4 ने पिछाडीवर असलेल्या कॅनडाने हार मानली नाही आणि सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात वर्चस्व गाजवले. 48 व्या आणि 53 व्या मिनिटाला लेयटन डिसोझाने दोन गोल करून त्यांच्या संघासाठी काही आशा निर्माण केल्या. परंतु शेवटच्या सात मिनिटांत आयर्लंडच्या बचावफळीला भेदण्यात अपयशी ठरल्याने कॅनडा बरोबरी साधू शकला नाही.
स्पेनकडून इजिप्तचा धुव्वा
दुसरीकडे, गट ‘ड’मधील सामन्यात स्पेनने इजिप्तचा 8-0 असा धुव्वा उडविला. ब्रुनो अविला (5 व्या, 24 व्या आणि 32 व्या मिनिटाला) याने तीन पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर करून हॅट्ट्रिक नोंदविली, तर जोसेप मार्टिन (27 व्या व 46 व्या मिनिटाला) याने स्पेनसाठी दोन गोल केले. स्पेनसाठी अल्बर्ट सेराहिमा (20 व्या मिनिटाला), आंद्रेस मेडिना (36 व्या मिनिटाला) आणि टोन मोरन (54 व्या मिनिटाला) हे इतर गोल करणारे खेळाडू होते.
गट ‘ड’मधील अन्य एका सामन्यात बेल्जियमने नामिबियाचा 12-1 असा पराभव केला. मॅथिस लॉवर्स (11 व्या, 24 व्या, 41 व्या व 42 व्या मिनिटाला) याने चार गोल केले, तर ह्युगो लाबौचेर (18 व्या, 22 व्या व 58 व्या मिनिटाला) याने हॅटट्रिक केली. बेल्जियमकडून नॅथन रोगे (18 व्या मिनिटाला), मॅथियस फ्रँकोइस (30 व्या मिनिटाला), बेंजामिन थिएरी (30 व्या मिनिटाला) आणि लुकास बाल्थाझर (36 व्या व 58व्या मिनिटाला) हे इतर गोल करणारे खेळाडू होते. नामिबियाचा एकमेव गोल जॉन-पॉल ब्रिट्झने 55 व्या मिनिटाला केला. ही स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरदरम्यान चेन्नई आणि मदुराईमध्ये खेळविली जाणार आहे.