Inchalakaranji Crime : जर्मनी गँगच्या सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या
चिन्या सूर्यवंशीच्या आत्महत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण
इचलकरंजी : शहरात गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला तसेच जर्मनी गँगचा सदस्य राजू उर्फ चिन्या संजय सूर्यवंशी (वय २५, रा. इंदिरा कॉलनी, जवाहरनगर) याने स्टेशन रोडवरील डेक्कन मिल समोरच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह आयजीएम रुग्णालयात विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पण, प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात होती.
चिन्या सूर्यवंशीवर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली होती. अलीकडेच त्याची हद्दपारीची मुदत संपल्यानंतर तो पुन्हा इचलकरंजीत १९ नोव्हेंबर रोजी परतला होता.
दरम्यान, घटनास्थळी तसेच आयजीएम रुग्णालयात सूर्यवंशीचे समर्थक जमा झाले होते. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत त्याचा मित्र प्रफुल्ल सुनील जाधव याने वर्दी दिली आहे.
