जर्मनीचे चान्सलर भारत दौऱ्यावर
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार : उद्या गोव्यातील कार्यक्रमात उपस्थिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवारी रात्री दिल्लीत आगमन झाल्यानंतर ते 25 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थान, 7, लोककल्याण मार्गावर नरेंद्र मोदींची भेट घेतील. यानंतर, दोन्ही नेते हॉटेल ताज पॅलेस येथे जर्मन बिझनेस समिट-2024 च्या 18 व्या आशिया-पॅसिफिक परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दोन्ही देशांमधील आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) आणि करारांची देवाणघेवाण करण्यासाठी हे नेते हैदराबाद हाऊस येथे भेटतील. ‘आयजीसी’ सल्लामसलतसाठी चान्सलर स्कोल्झ यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्रीही उपस्थित असतील. ‘आयजीसी’ परिषदेमध्ये दोन्ही बाजूंचे मंत्री आपापल्या जबाबदारीच्या क्षेत्रांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी जर्मन चान्सलर गोव्याला रवाना होतील. गोव्यात जर्मन नौदलाचे फ्रिगेट “बाडेन-वुर्टेमबर्ग” आणि लढाऊ समर्थन जहाज “फ्रँकफर्ट एŸम मेन” जर्मनीच्या इंडो-पॅसिफिक तैनातीचा भाग म्हणून निर्धारित बंदरावर थांबेल. गोव्यातील कार्यक्रमानंतर भारत दौऱ्याचा समारोप करून ते दुसऱ्या दिवशी जर्मनीला परततील.
भारत-जर्मनी संबंध
जर्मनी हा युरोपमधील भारताचा सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे. दोन्ही देशांमध्ये 2000 पासून ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ असून ती द्विपक्षीय ‘आयजीसी’मुळे आणखी मजबूत झाली आहे. संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि उच्च शिक्षण अशा विविध आघाड्यांवर दोन्ही देशांमध्ये सहकार्य आहे. भारत आणि जर्मनी यांच्यात मजबूत आर्थिक आणि विकासात्मक भागिदारी आहे. देशाच्या विकासात सकारात्मक योगदान देणारे भारतीय लोक जर्मनीत मोठ्या संख्येने राहतात.