For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदूद्वेषाविरोधात जॉर्जियामध्ये विधेयक

06:20 AM Apr 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिंदूद्वेषाविरोधात जॉर्जियामध्ये विधेयक
Advertisement

गेल्या काही महिन्यांमधील घडामोडींचा परिणाम, हिंदू धर्माविरोधात द्वेषपूर्ण कृती गुन्हा ठरणार

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

हिंदू धर्म आणि हिंदू समाज यांच्या विरोधात हिंसक कृत्ये करणे हा गुन्हा ठरविण्यासाठी अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांताच्या लोकप्रतिनिधीगृहात विधेयक सादर करण्यात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या प्रांतात हिंदू समाज आणि हिंदू धर्म यांचा अवमान करणाऱ्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी, तसेच हिंदू धर्माच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी हे विधेयक तेथील काही लोकप्रतिनिधींनी सादर केले आहे. हिंदूफोबिया किंवा हिंदूद्वेष हा गुन्हा मानण्यात यावा आणि अशा गुन्ह्याला कायद्याप्रमाणे दंड देण्यात यावा, अशी तरतूद या विधेयकात आहे. हे विधेयक संमत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

हे विधेयक संमत झाल्यास हिंदूंच्या किंवा हिंदू धर्माच्या विरोधात द्वेषपूर्ण कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांना अधिकार मिळणार आहेत. तसेच हिंदूद्वेष म्हणजे नेमके काय याची व्याख्याही निर्धारित केली  जाणार आहे. मात्र, हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात नाही. कायद्याच्या चौकटीत राहून कोणत्याही धर्मावर टीका करणे किंवा विशिष्ट मुद्दे उपस्थित करणे, यावर हे विधेयक बंधने घालणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हिंसाचार रोखला जाणार

या विधेयकामुळे या प्रांतात हिंदूधर्मियांविरोधातील हिंसाचार रोखला जाण्याची शक्यता आहे. तसेच हिंदू धर्माच्या कायदेसंमत चालीरीतींचा अवमान करण्याची कृतीही या विधेयकाच्या कार्यकक्षेत आणली जाणार आहे. हिंदू धर्म आणि हिंदू समाज यांच्या विरोधात पक्षपात होऊ नये. हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण अमेरिकेतील कायद्यांच्या चौकटीत केले जावे, हा या विधेयकाचा हेतू असल्याचे, ते सादर करणाऱ्या लोकप्रतिनिधिंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

या विधेयकाचे महत्व काय ?

अमेरिकेतल्या कोणत्याही प्रांतात हिंदू धर्माच्या संबंधात सादर करण्यात आलेले हे अशा प्रकारचे प्रथम विधेयक असण्याची शक्यता आहे. हिंदूफोबिया किंवा हिंदूधर्मद्वेष अमेरिकेत काही स्थानी वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. विशिष्ट व्यक्ती एका विशिष्ट धर्माची आहे, म्हणून तिच्या विरोधात पक्षपात करणे, त्या व्यक्तीला समान संधी नाकारणे, त्या व्यक्तीचा अवमान होईल अशी कृती करणे याला फोबिया किंवा धर्मद्वेष असा शब्द आहे. हिंदू धर्म आणि हिंदू समाज यांच्या विरोधात असा प्रकारे पक्षपात घडल्याची अनेक उदाहरणे अमेरिकेच्या विविध भागांमध्ये आणि विशेषत: जॉर्जिया प्रांतात घडली आहेत. त्यामुळे अमेरिकेतील अनेक हिंदू संघटनांनी अशा विधेयकाची मागणी केली होती.

व्याख्या ठरल्याने सुविधा

या विधेयकाच्या माध्यमातून हिंदूद्वेष या संज्ञेची व्याख्या निर्धारित केली जाणार आहे. या व्याख्येचा उपयोग हिंदू व्यक्ती किंवा हिंदू धर्म यांच्या विरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी शिक्षेचे प्रमाण ठरविताना होणार आहे. धर्मद्वेषासाठी अधिक कठोर शिक्षा केली जाऊ शकते. जॉर्जिया प्रांतातील सरकारी वकीलांना हिंदूद्वेषाची प्रकरणे हाताळताना अधिक अधिकार या विधेयकामुळे प्राप्त होणार आहेत.

हे विधेयक येत्या दोन आठवड्यांमध्ये जॉर्जिया प्रांताच्या प्रतिनिधीगृहात चर्चेला येणार असून ते संमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विधेयकाला रिपब्लिकन आणि डेमॉव्रेटिक अशा दोन्ही पक्षांच्या सदस्यांचा पाठिंबा आहे. जॉर्जियात ते संमत झाल्यास अमेरिकेच्या अन्य प्रातांमध्येही अशाच प्रकारची विधेयके सादर होण्याची शक्यता आहे. जॉर्जियातील हिंदू संघटनांनी या विधेयकाचे स्वागत करताना, ते संमत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जॉर्जियातले विधेयक पथदर्शक ठरणार

ड हिंदूंच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी हे विधेयक महत्वपूर्ण

ड प्रतिस्पर्धी पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे संमत होण्याची शक्यता

ड जॉर्जियानंतर अमेरिकेतील इतर प्रांतांमध्येही अशी विधेयके येण्याची शक्यता

ड हिंदूफोबिया किंवा हिंदूद्वेष या संज्ञेची व्याख्या विधेयकाद्वारे ठरविली जाणार

Advertisement
Tags :

.