For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनरल उपेंद्र द्विवेदी 30 वे लष्करप्रमुख

06:58 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनरल उपेंद्र द्विवेदी 30 वे लष्करप्रमुख
Advertisement

जनरल मनोज पांडे यांच्याकडून स्वीकारला पदभार : पांडे यांना सेवानिवृत्तीपूर्वी गार्ड ऑफ ऑनर; 26 महिने राहिले पदावर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवार, 30 जून रोजी नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे 30 वे लष्करप्रमुख ठरले आहेत. यावषी 19 फेब्रुवारी रोजी ते लष्कराचे उपप्रमुख झाले. लष्करप्रमुख झाल्यावर द्विवेदी यांना लेफ्टनंट जनरलवरून ‘जनरल’ पदावर बढती देण्यात आली. केंद्र सरकारने 11 जूनच्या रात्री त्यांना लष्करप्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करातील इतर अनेक कमांडचे प्रमुख म्हणून काम केले आहे.

Advertisement

जनरल द्विवेदी यांची जनरल मनोज पांडे यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जनरल मनोज पांडे हे रविवारी निवृत्त झाले असून कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ते 26 महिने लष्करप्रमुख पदावर राहिले. सरकारने गेल्या महिन्यात जनरल पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवला होता. जनरल मनोज पांडे हे 31 मे रोजी निवृत्त होणार होते. याच्या अवघ्या सहा दिवसांपूर्वी म्हणजे 25 मे रोजी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता जनरल द्विवेदी यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ अधिकारी दक्षिणेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांचे नाव आघाडीवर आहे.

जनरल द्विवेदी हे लष्करात नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर काम करत होते. यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करातील इतर अनेक कमांडचे प्रमुख म्हणून सेवा बजावलेली आहे. तंत्रज्ञानाच्या वापरासाठी उत्साही असल्याने द्विवेदी यांनी नॉर्दर्न कमांडमधील सर्व श्रेणींच्या तांत्रिक सीमा वाढवण्याचे काम केले. त्यांनी बिग डेटा अॅनालिटिक्स, एआय, क्वांटम आणि ब्लॉकचेन-आधारित सोल्यूशन्स यासारख्या महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच आपल्या दोन परदेशी असाईनमेंटदरम्यान सोमालिया मुख्यालय आणि सेशेल्स सरकारचे लष्करी सल्लागार म्हणूनही काम केले आहे. त्याचबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि महू येथे हायकमांडच्या अभ्यासक्रमातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या सेवेदरम्यान डिस्टिंग्विश्ड फेलो हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासात एम्फिल पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय मिलिटरी सायन्समध्ये दोन पदव्युत्तर पदव्याही मिळवल्या आहेत.

विद्यमान लष्कर आणि नौदलप्रमुख ‘वर्गमित्र’

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी हे वर्गमित्र (क्लासमेट) राहिले आहेत. भारतीय संरक्षण इतिहासात दोन वर्गमित्र देशाच्या लष्कराच्या तीनपैकी दोन सेवांचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 1970 च्या दशकाच्या सुऊवातीला पाचवी इयत्तेमध्ये एकत्र शिकत होते, अशी माहिती उघड झाली आहे.

Advertisement
Tags :

.