सामान्य वर्गाला साडेतीन लाख तर अनुसूचित जाती-जमातीला 4 लाख देणार
गृहनिर्माण योजनेबाबत मंत्री जमीर अहमद खान यांची माहिती
बेळगाव : राज्यात विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू असून लाभार्थींना घर बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने देण्यात येणारी बिले प्रलंबित ठेवण्यात आलेली नाहीत. मंजूर झालेल्या घरांना चार टप्प्यामध्ये पैसे देण्यात येत आहेत. सध्या सामान्य वर्गासाठी दीड तर अनुसुचित जाती जमातीसाठी अडीच लाख रुपये देण्यात येतात. यात बदल करून सामान्यवर्गाला साडेतीन लाख रुपये तर अनुसूचित जाती-जमातीला घरे बांधण्यासाठी 4.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा पुढील अधिवेशनात केली जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांनी दिली.
विधानपरिषद सदस्य शिवकुमार के. यांनी, वारंवार जीपीएस करण्यापेक्षा फाऊंडेशन व प्लेंथ लेव्हलपर्यंत जीपीएस मर्यादित ठेवून लाभार्थींना वेळेवर घराचे पैसे द्यावेत. शहरी भागातही गरीबांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री जमीर अहमद खान यांनी, राज्यात गरीबांना हजारोंच्या संख्येने घरे मंजूर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांनीही पात्र लाभार्थींना घरे मंजूर करून त्यांना वेळेवर पैसे देण्याची सूचना केली आहे. या दिशेने कार्य करण्यात येत असून राज्य सरकारमार्फत यंदा 66 हजार घरांचे वितरण केले आहे. तर हजारो घरांनी मंजुरीची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल. लाभार्थींना दिले जाणार पैसे प्रलंबित ठेवण्यात आले नसून त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
यंदा 66 हजार घरांचे वितरण
केंद्र व राज्य सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत राज्यातील गरीबांना हजारोंच्या संख्येने घरे मंजूर केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी जास्तीतजास्त घरांचे वितरण करण्याचे लक्ष्य ठेवले असून आपले खातेही या दृष्टीने काम करत आहे. चालू वर्षात 66 हजार घरांचे गोरगरीबांना वितरण करण्यात आले असून येत्या काळात 47 हजार घरांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.