जिलेटीनच्या स्फोटाने हिरेबागेवाडी परिसराला हादरा
बडेकोळ घाट येथील घटना, चौघा जणांविरोधात गुन्हा
बेळगाव : बडेकोळ घाटातील खडी मशीनच्या शेडमधील जिलेटीनचा स्फोट झाल्याने परिसराला मोठा हादरा बसला. मंगळवार दि. 18 रोजी सायंकाळी ही घटना घडली असून कोळीकोप्प गावातील घरांच्या भिंतींना तडे जाण्यासह साहित्याचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात खडी मशीन मालक आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश हनमाप्पा अळ्ळी (रा. बागलकोट), प्रकाश तरगार (बडेकोळ), परशराम यल्लाप्पा बागेवाडी (रा. बेल्लद बागेवाडी) आणि गणेश हिरेमठ (रा. होवीनहडगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हिरेबागेवाडीनजीकच्या बडेकोळ घाट येथे ऐश्वर्या स्टोन क्रशर असून मूळ मालकाने ही खडी मशीन गणेश हिरेमठ यांना चालविण्यासाठी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्याठिकाणी खडी मशीन चालविली जात आहे. खडी मशीनसाठी लागणारा दगड फोडण्यासाठी सुरुंग लावले जातात. सुरुंग उडविण्यासाठी जिलेटीनचा वापर केला जातो. 0
खडी मशीन चालक गणेश हिरेमठ व त्यांचे सुपरवायझर सुरेश हनमाप्पा अळ्ळी, प्रकाश तरगार, परशराम यल्लाप्पा बागेवाडी त्याठिकाणी असतात. बडेकोळ घाटामध्ये असलेल्या ऐश्वर्या स्टोन क्रशरसाठी लागणारे जिलेटीन एका शेडमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्या शेडमध्ये जिलेटीन ठेवण्यात आले आहेत, असा सूचना फलक लावण्यात आला नव्हता. तसेच कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नव्हती. मंगळवारी दुपारी काहींनी बडेकोळ घाटातील डोंगराला आग लावली होती. आगीची झळ जिलेटीन ठेवलेल्या शेडपर्यंत पोहोचल्याने अचानक जिलेटीनचा स्फोट झाला. मोठ्या प्रमाणात आवाज येण्याबरोबरच परिसराला हादरा बसला. त्यामुळे कोळीकोप्प गावातील घरांच्या भिंतींना तडे गेले. तसेच घरातील साहित्याचेही नुकसान झाले. यामध्ये अंदाजे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. तसेच डोंगराला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. याप्रकरणी परशराम पिराजी पुजेरी (वय 29 रा. कोळीकोप्प) यांनी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात वरील चौघांविरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.