महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गीता जयंती

06:06 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्र येथे युद्धासाठी जमलेल्या कौरव-पांडवांपैकी आपल्या कर्तव्याविषयी संभ्रमित झालेल्या अर्जुनाला भगवत गीतेचा उपेदश दिला होता. यासाठी या दिवसाला गीता जयंती या नावाने सुद्धा संबोधिले जाते. भगवत गीता हा केवळ ज्ञान प्रदान करणारा ग्रंथ नसून जगातील कोणत्याही ग्रंथामध्ये उपलब्ध नसणारे सत्य सर्व जीवांच्या कल्याणासाठी या दिव्य ग्रंथाद्वारे भगवान श्रीकृष्णांनी सर्वांपुढे  मांडले आहे.

Advertisement

भगवतगीतेमध्ये 574 श्लोक हे भगवानुवाच म्हणजे प्रत्यक्ष भगवान कृष्णांनी सांगितले आहेत. 84 श्लोक हे अर्जुनाच्या मुखी आहेत. 41 श्लोक हे संजयने म्हटले आहेत. तर केवळ एकमेव असा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखी आहे. असे भगवद्गीतेमध्ये  एकूण 700 श्लोक आहेत. संजय कोण होता, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असेल. ते प्रथम जाणून घेऊया. संजय हा सूतजातीतील सारथी गवलगण याचा पुत्र होता. सूतजाती ही प्रामुख्याने रथाचे सारथ्य करणारी जमात म्हणून ओळखली जात असे. अशा या कुळात जन्मलेल्या संजयला लहानपणापासूनच शास्त्रामध्ये गोडी निर्माण झाली होती. म्हणून तो वेदव्यासजींकडे गेला. व्यास यांनी संजयची परीक्षा घेतली. त्यात तो उत्तीर्ण झाला. व्यासजी त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याने आपले शिक्षण त्यांच्याकडे पूर्ण केले. सूतजातीमध्ये जन्माला येऊनसुद्धा त्याला ब्राह्मण म्हणून मान्यता मिळाली. वर्ण परिवर्तनाचे हे एक उत्तम  उदाहरण आहे. वेदव्यासजींनी आपल्या या सुयोग्य व तेजस्वी शिष्याला धृतराष्ट्राच्या पदरी नियुक्त केले. व्यासजींचे धृतराष्ट्रावर पुत्रवत प्रेम होते. त्यांनी धृतराष्ट्राला संजयच्या  रुपात एक विश्वस्त सल्लागार दिला. याच संजयने आज ज्याप्रमाणे दूरवर  चाललेल्या एखाद्या खेळाचे दूरदर्शनवर समालोचन होते. त्याप्रमाणे हस्तिनापूर येथे आपल्या राजवाड्यात बसलेल्या धृतराष्ट्राला जवळ जवळ 90 मैल दूर असलेल्या कुरुक्षेत्र येथे चाललेला भगवान वेदव्यासजींनी दिलेल्या दिव्यदृष्टीमुळे युद्धभूमीवरचा संपूर्ण तपशील त्याने कथन केला. आपल्यालाही भगवत गीता समजून घ्यावयाची असल्यास ज्याप्रमाणे संजयने व्यासदेवांच्या कृपेने ही भगवत गीता समजून घेतली आणि जशी आहे तशी धृतराष्ट्राला समजावून सांगितली या पद्धतीनेच समजून घेतली पाहिजे.

Advertisement

या विषयी संजय म्हणतो. (भ गी 18.74)

इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन:। संवादमिममश्रौषमद्भूतं रोमहर्षणम्।।

अर्थात, ‘संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुन या दोन महात्म्यांच्या संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अदभूत आणि रोमांचकारी आहे.’ भगवत गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की, कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय घडले? संजयचे गुरु व्यासदेवांच्या कृपेने कुरुक्षेत्र येथे घडणाऱ्या सर्व घटना संजयच्या हृदयामध्ये  स्फुरत होत्या. त्या ठिकाणी घडलेला संवाद हा अत्यंत अदभूत होता. कारण श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांमध्ये असा महत्त्वपूर्ण संवाद कधी यापूर्वी घडला नव्हता आणि यापुढेही कधी घडणार नव्हता. हा संवाद अदभूत असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य शक्तींविषयी  आणि  स्वत:विषयी, सर्व जीवांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपला महान भक्त अर्जुनाला सांगत होते. जे कोणी प्रामाणिकपणे श्रीकृष्णाला जाणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी अर्जुनाच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले तर आपले जीवन श्रीकृष्णमय बनून सुखी आणि शांतिमय होईल. यापुढील श्लोकामध्ये संजय म्हणतो (भ. गी. 18.75)

व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यामहं परम्।

योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयत: स्वयम्।।

अर्थात,  ‘व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्या ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे.’ व्यासदेव हे संजयचे अध्यात्मिक गुरु होते म्हणून संजय मान्य करतो की व्यासदेवांच्या कृपेनेच तो भगवान श्रीकृष्ण आणि त्यांनी दिलेला उपदेश जणू शकला. हे दर्शविते की मनुष्याने भगवान श्रीकृष्ण यांना प्रत्यक्ष न जाणता भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून चालत आलेल्या प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेतील गुरुच्या माध्यमाद्वारे जाणले पाहिजे. अध्यात्मिक गुरु हा पारदर्शक माध्यमाप्रमाणे असतो, तो स्वत:चे ज्ञान सांगत नाही तर जे परंपरेतून आणि प्रत्यक्ष  भगवंताकडून आलेले ज्ञान जसे आहे तसे सांगतो. श्रीकृष्णापासून प्रत्यक्ष ऐकणे आणि व्यासदेवांसारख्या प्रमाणित अध्यात्मिक  गुरुच्या मुखातून ऐकणे यात कोणत्याही प्रकारचा भेद असू शकत नाही. नारद मुनी हे श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष शिष्य आहेत, आणि व्यासदेवांचे गुरु आहेत. म्हणून अर्जुनाप्रमाणे व्यासदेवही तितकेच प्रमाणित आहेत. संजय हा त्याच व्यासदेवांचा शिष्य आहे म्हणून त्यांच्या कृपेने संजयच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो प्रत्यक्ष श्रीकृष्णांना पाहू आणि ऐकू शकला. अध्यात्मिक साधक जर अशा गुरुशिष्य परंपरेतून आलेल्या माहात्म्याकडून श्रवण करत  नसेल तर त्याचे भगवत गीतेचे ज्ञान अपूर्णच राहते.

यानंतर संजय भगवत गीतेचे ज्ञान भगवान श्रीकृष्णाकडून ऐकताना त्याची स्वत:ची स्थिती कशी होती याचे वर्णन करतो. (भ गी 18.76)

राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भूतम्। केशवार्जुनयो: पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहु:।।

अर्थात ‘हे राजन, श्रीकृष्ण  आणि अर्जुन यांच्या या अदभूत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष  होत आहे.’ भगवत गीतेतील श्रीकृष्ण आणि अर्जुन यामधील संवाद जो ऐकतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो पुण्यवान होतो, आणि  वारंवार या संवादाची त्याला जीवनातील प्रत्येक प्रसंगी आठवण होते. जो व्यक्ती योग्य मार्गाने म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या गुरुशिष्यपरंपरेतून चालत आलेल्या व्यक्तीकडून गीतेचे ज्ञान स्वीकार करतो तो अर्जुनाप्रमाणेच श्रीकृष्णाचा निस्सीम श्रीकृष्ण भक्त बनतो आणि केवळ अल्प काळासाठीच नव्हे तर क्षणोक्षणी तो संजय प्रमाणेच हर्षमय जीवनाचा आनंद घेतो.

पुढे संजय आपण वारंवार हर्षित का होत होतो यांचे वर्णन करताना म्हणतो (भ गी 18.77)

तच्च संस्मृत्य संस्मृत्य रुपमत्यद्भूतं हरे:। विस्मयो मे महान्राजन्हृष्यामि च पुन: पुन:।।

अर्थात ‘हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अदभूत रुप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला  पुन: पुन्हा हर्ष होत आहे.’ संजयच्या हर्षाचे कारण हे आहे की, व्यासदेवांच्या कृपेने त्यालाही श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी प्रकट केलेले विश्वरुप पाहता आले. त्यामुळे श्रीकृष्ण स्वत: भगवान आहेत याबद्दल त्यालाही खात्री झाली. यासाठी पुढील श्लोकात संजय म्हणतो. (भ गी 18.78)

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर:।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।

अर्थात, ‘जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर  अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे.’

भगवत गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्रांनी विचारलेल्या प्रश्नांनी झाला, त्याला आपला पुत्र त्याला सहाय्य करणाऱ्या  भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी महान योद्ध्यांच्या साहाय्याने विजयी होईल याबद्दल खात्री होती. आपल्या पक्षाचा विजय होणार याची त्याला आशाही होती. परंतु कुरुक्षेत्रावरील युद्ध परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर संजय धृतराष्ट्राला  म्हणाला, तुम्ही विजयाची आशा करीत आहात परंतु माझे मत आहे की, जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखा भक्त उपस्थित आहेत तेथे विजय निश्चितच असतो. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य स्वीकारणे हा ऐश्वर्याचा एक भाग आहे, कारण भगवान षडैश्वर्यपूर्ण आहेत. नीतिमत्तेबद्दल बोलायचे तर जे श्रीकृष्ण सांगतात तीच नीती आहे कारण ते नेहमीच सत्य जाणतात आणि ते स्वत: परमसत्य आहेत. भगावान श्रीकृष्णांचा गीतेतील शेवटचा उपदेश म्हणजे धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश आहे आणि तो म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे होय.

भगवत गीतेमधील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून सर्व जीवांसाठी विशेषत: मनुष्य शरीर प्राप्त झालेल्यांसाठी दिलेला उपदेश म्हणजेच सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचाही मार्ग आहे. इतर सर्व मार्ग हे आत्म्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि या भक्तिमार्गाप्रत उन्नती करण्यासाठी आहेत.

महाभारत मध्येही सांगितले आहे (भीष्मपर्व 63.1)

गीता सुगीता कर्तव्या किमन्ये: शास्त्रसंग्रहे:। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनी:सृता।।

अर्थात, गीतेचे शुद्ध अंत:करणाने श्रवण, कीर्तन, पठण-पाठण, मनन आणि धारण केले पाहिजे. अन्य कोणत्याही शास्त्राचा संग्रह करण्याची आवश्यकता नाही. कारण स्वयं पद्मनाभ भगवंताच्या मुखातून गीता प्रसारित झाली आहे.

वृंदावन दास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article