जीडीपी दर 6.5 टक्के राहणार : रेटींग एजन्सी फिचचा अंदाज
वृत्तसंस्था/मुंबई
फिच रेटींग एजन्सीनुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा विकास दर 6.5 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज मांडला आहे. पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाचा ओघ वाढण्याची शक्यता फिच रेटिंग यांनी व्यक्त केली आहे. या आधारावरच कंपनीने वरील प्रमाणे जीडीपी दर राहणार असल्याचे म्हटले आहे.
2027 वर्षात किती राहणार जीडीपी दर
कंपनीने आर्थिक वर्ष 2027 साठी विकास दर म्हणजेच जीडीपी दर 6.3 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अमेरिकेतील सध्याच्या वातावरणाचा फारसा परिणाम भारतावर अपेक्षीत नाही. विदेशातून होणाऱ्या मागणीचा विचार करता भारत काही अंशी अप्रभावित राहू शकतो, असेही एजन्सीने म्हटले आहे. आर्थिक सर्व्हेक्षणानुसार आर्थिक वर्ष 2025-26 साठी 6.3 ते 6.8 जीडीपी दर राहणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. सध्याची एकंदर परिस्थिती पाहता जीडीपी दर 6.5 टक्क्यांच्या आसपास राहू शकतो. वाहनांच्या विक्रीमध्ये घट पहायला मिळाली आहे. महागाई कमी झाली असून उत्पन्नामध्ये वाढीला पुरेसा वाव मिळणार आहे.
सवलतीमुळे क्रयशक्ती वाढणार
1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने दिलेल्या सवलतीमुळे भारतीयांमध्ये खर्च करण्याचे प्रमाण येणाऱ्या काळात वाढणार आहे. विविध वस्तुंची खरेदी कर सवलतीमुळे करण्याकडे अनेकांचा कल पहायला मिळणार आहे. व्यवसायामधील विश्वास अधिक वाढलेला असून बँका कर्ज देण्याच्या प्रमाणामध्ये दुप्पट विकास साधू शकतात, असेही एजन्सीने म्हटले आहे.