'जीबीएस' रुग्णाचा सीपीआरमध्ये मृत्यू
कोल्हापूर :
गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण झालेल्या वृद्धेचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाला. गौराबाई गावडे (वय 60, रा. सोनारवाडी, ता. चंदगड) असे या मृत वृद्धेचे नाव आहे. जीबीएस आजाराने जिल्ह्यात पहिला मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर हे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असुन आारोग्य यंत्रणा सदृढ करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.
गावडे यांचे हातपाय लुळे पडून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्रास आणखी वाढू लागल्याने त्यांना मंगळवार दि.11 रोजी पहाटे सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. येथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना जीबीएस आजाराची लागण झाली असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तत्काळ त्यांच्यावर उपचार करण्यास सुरूवात केली. त्यांना व्हेंटीलेटरसह प्लाझमा थेरपीचे उपचार चालू होते. मात्र उपचारास कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांचा गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सीपीआरमध्ये जीबीएसची लागण झालेल्या आणखी 6 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये निपाणी येथील एक बालक, वसगडे येथील एक बालक, निपाणी येथील एक वृद्ध, एक तरूण व अन्य दोन वृद्ध अशा सहा जणांच समावेश आहे. त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. या सहाही रूग्णांवर तज्ञ डॉक्टरांचे पथक 24 तास लक्ष ठेऊन असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी सांगितले.
- जिल्ह्यात खळबळ, आरोग्य यंत्रणा अलर्ट
जीबीएस आजाराची लागण झालेल्या वृद्धेचा जिल्ह्यात पहिला मृत्यू झाल्याने सर्वच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जीबीएस मृत्यूमुळे खळबळ उडाली असुन दिवसभर याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर सर्वच आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
- नागरिकांनी घाबरून जावू नये
जीबीएस हा संसर्गजन्य रोग नसून तो दुषित पाण्यातील विषाणूमुळे होतो. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सीपीआरमध्ये जीबीएस उपचारासाठी 70 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. व्हेंटीलेटर व औषधसाठा मुबलक प्रमाणात आहे. तज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात करण्यात आले असुन नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी केले आहे.