अटी मान्य न केल्यास गाझा जमीनदोस्त
इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा
जेरूसलेम :
युद्धविराम चर्चेदरम्यान इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी हमासला इशारा दिला आहे. हमासने अटी मान्य न केल्यास गाझा शहराला जमीनदोस्त केले जाऊ शकते. इस्रायल या क्षेत्रात मोठ्या आक्रमणाची तयारी करत असल्याचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी स्पष्ट केले आहे.
गाझातील सर्वात मोठे शहर राफा आणि बेत हनूनला पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकते. गाझामध्ये हमासच्या मारेकरी आणि बलात्काऱ्यांकरता लवकरच नरकाचे द्वार खुले होणार आहे. इस्रायलने सर्व ओलिसांची मुक्तता आणि हमासचे पूर्ण निशस्त्राrकरणाची मागणी केली असल्याचे काट्ज यांनी सांगितले आहे.युद्ध समाप्त करण्याच्या बदल्यात आम्ही ओलिसांची मुक्तता करू. परंतु पॅलेस्टिनी राष्ट्राच्या निर्मितीशिवाय निशस्त्राrकरणाची मागणी अमान्य करत असल्याचे हमासकडून म्हटले गेले आहे.
इस्रायलची नवी सैन्य मोहीम
इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी गाझासिटीच्या सर्वात घनदाट भागांमध्ये कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. याच्या अंतर्गत 60 हजार नव्या राखीव सैनिकांना पाचारण करण्यात आले आहे. तर पूर्वीपासून तैनात 20 हजार राखीव सैनिकांचा सेवा कालावधी वाढविण्यात येणार आहे. आतापर्यंत जमिनीवर कारवाई न केलेल्या गाझाच्या हिस्स्यांमध्ये आता इस्रायल सैन्यमोहीम राबविणार आहे. या मोहिमेचे मुख्य लक्ष्य हमासच्या भूमिगत भुयारांच्या जाळ्यांना नष्ट करणे आहे.
हमासकडून युद्धविरामावर सहमती
इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थी अंतर्गत प्राप्त युद्धविराम प्रस्तावाला सहमती दर्शविली असल्याचे हमासकडून यापूर्वी सांगण्यात आले आहे. परंतु इस्रायलकडून अद्याप याला मान्यता देण्यात आलेली नाही. या प्रस्तावात काही ओलिसांच्या मुक्ततेच्या बदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता, इस्रायली सैन्य मागे हटण्याची प्रक्रिया आणि स्थायी युद्धविरामावर भविष्यातील चर्चा सामील आहे.