गाझापट्टीतील शरणार्थी शिबिराला आग, 21 ठार
मृतांमध्ये 10 मुलांचा समावेश
वृत्तसंस्था/ गाझा
गाझा पट्टीमध्sय गुरुवारी रात्री एका शरणार्थी शिबिराला आग लागली असून या दुघटनेत 21 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये 10 मुलांचा समावेश आहे. मोठय़ा संख्येत पॅलेस्टिनी शरणार्थींचे वास्तव्य असलेल्या इमारतीला ही आग लागली होती. वायूगळती झाल्याने ही आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. इमारतीत गॅसोलीन ठेवण्यात आले होते, आग याच्यामुळेच लागली असावी असा अनुमान प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आगीची तीव्रता अधिक असल्याने मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. मृतांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. अनेक जण गंभीररित्या होरपळले गेल्याने मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती एका अधिकाऱयाने व्यक्त केली आहे.
इमारतीत गॅसोलीन ठेवण्यात आले होते आणि याचा वापर करत तेथे जनरेटर चालविला जात होता. इमारतीतील एका कुटुंबाचा सदस्य विदेशातून परतला होता, त्याच्याकरता तेथे आनंदोत्सव करण्यात येत होता. मृतांमध्ये बहुतांश जण हे एकाच कुटुंबाचे सदस्य असल्याचे अधिकाऱयाने सांगितले.
आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागला. यादरम्यान लोकांना वाचविण्यासाठी मोहीम सुरु होती. इमारतीत राहत असलेल्या बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या दुर्घटनेला राष्ट्रीय शोकांतिका घोषित करत एका दिवसाचा शोक जाहीर केला आहे.
गाझापट्टी जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणाऱया ठिकाणांपैकी एक आहे. येथे 23 लाख लोकांचे वास्तव्य आहे. सर्वसाधारणपणे लोकसंख्येचे अधिक घनता असलेल्या ठिकाणांमध्ये एका चौरस किलोमीटर क्षेत्रात 5,700 लोकांचे वास्तव्य असते. परंतु गाझापट्टीत एका चौरस किलोमीटर क्षेत्रात 9 हजार लोक राहत आहेत.