गाझा शस्त्रसंधीला आजपासून प्रारंभ
करारावर स्वाक्षरी न झाल्याने लांबणीवर
वृत्तसंस्था /जेरुसलेम
गाझा पट्टीत गुरुवारपासून अपेक्षित असलेली इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंधी लांबणीवर पडली आहे. मात्र, तिचा प्रारंभ आज शुक्रवारपासून होईल अशी शक्यता आहे. शस्त्रसंधी करारावर इस्रायल, हमास आणि कतार या तिन्ही संबंधितांच्या स्वाक्षऱ्या न झाल्याने ती 24 तास लांबणीवर पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर ती लागू होणार आहे. ओलिसांच्या बदल्यात इस्रायल हमासच्या 150 कैद्यांची सुटका करणार आहे. तथापि, इस्रायलचे सुरक्षा सल्लागार झाची हनेग्बी यांनी अद्याप चर्चा होतच असल्याचे स्पष्ट केल्याने शुक्रवारी शस्त्रसंधीचा प्रारंभ होणार का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हनेग्बी यांनीच शस्त्रसंधी लांबणीवर पडल्याची घोषणा केली. मात्र, या विलंबाचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. त्यामुळे शंका वाढली आहे.
वातावरणनिर्मिती सुरु
शस्त्रसंधी होण्यासाठी आवश्यक अशा अनुकूल वातावरणाची निर्मिती करण्याचे कार्य अद्याप सुरु आहे असे इस्रायलकडून स्पष्ट करण्यात येत आहे. कतारच्या विदेश विभागाचे एक प्रवक्ते मजेद अल् अन्सारी यांनीही हेच कारण दिले आहे. शस्त्रसंधी लागू केली जाण्याची नवी वेळ काही वेळात घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या शस्त्रसंधीत करारने मध्यस्थी केली आहे.
गाझात मृतांच्या संख्येत वाढ
शस्त्रसंधीची चच्ाा& सुरु असतानाही गाझापट्टीच्या उत्तर भागात इस्रायलची कारवाई सुरु होती. गुरुवारी इस्रायलने हमासच्या अनेक स्थानांवर हल्ले करुन ती नष्ट केल्याची माहिती देण्यात आली. इस्रायलच्या कारवाईत आतापर्यंत गाझात 13,300 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6 हजारांहून अधिक बेपत्ता आहेत, असा दावा पॅलेस्टाईन प्रशासनाने केला आहे. हमासचे हजारो दहशतवादी आतापर्यंतच्या कारवाईत ठार झाले असल्याचे इस्रायलच्या संरक्षण विभागाचे म्हणणे आहे.
युद्ध होतच राहील!
ही शस्त्रसंधी तात्पुरती असून ती केवळ ओलिसांच्या सुटकेसाठी स्वीकारण्यात आली आहे. तथापि, हे युद्ध हमासचा पूर्ण खात्मा होईपर्यंत होत राहील, अशी स्पष्टोक्ती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलाr आहे. इस्रायल हमासच्या संपूर्ण पायाभूत सुविधा उध्वस्त करणार असून गाझापट्टीत सेना राहणार आहे, असेही इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे.