‘गायत्री’च्या सुपारी काथ्याला मिळालं आफ्रिकन पेटंट...!
शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाच्या गायत्री गोखलेची कामगिरी : झिरो गुंतवणुकीत उत्पादन; कोकणातील सुपारीची टरफलातून बनवला काथ्या
अहिल्या परकाळे कोल्हापूर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा हे गायत्रीचं गाव. तिने गावी गेल्यानंतर सुपारीची टरफले जाळताना पाहिले, अन् त्याचा पुर्नवापर कसा करता येईल, याचा ती विचार करू लागली. त्यातूनच कोल्हापुरात स्थायिक झालेल्या गायत्री गोखलेने पैसे खर्च न करता नैसर्गिक पध्दतीने सुपारीच्या काथ्यावर संशोधन केले. तिच्या या संशोधनाला आफ्रिकन पेटंट प्राप्त झाले आहे. या काथ्याला बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, यावर तिचे संशोधन सुरू आहे. त्यासाठी तिने पेटंट फाईल सादर केली आहे. तिने कोकणवासियांना स्वयंरोजगाराची दिशा देत विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
कोकणात नारळाच्या शेंडीपासून काथ्याचा उद्योग विकसित झाला आहे, त्याला मोठी बाजारपेठही उपलब्ध आहे, पण कोकणात सुपारीची टरफल जाळली जात असल्याचे गायत्रीने गावी गेल्यानंतर पाहिले. अन् सुपारीपासून निर्मित काथ्या पर्यावरणपूरक असल्याने, त्याच्या उत्पादनांना वाढती मागणी असल्याचे तिला दिसून आले. त्यावर तिने अभ्यास सुरू केला. त्यातूनच सुपारीपासून काथ्या निर्मितीच्या तिच्या संशोधनाला अािफ्रकन देशातून पेटंट मिळाले आहे.
गायत्रीने व तिचे काका महेश गोखले यांनी गावी रानात ख•ा खणून त्यात सुपारीची टरफल टाकली. ती कुजली, पण व्यवस्थित काथ्या तयार न झाल्याने हा प्रयोग फसला. त्यानंतर तिने ख•dयात सुपारीची टरफल टाकत त्यात शेण-माती आणि पाण्याचे मिश्रण टाकले. त्यातून उत्तम प्रतिचा काथ्या तयार झाला. या पर्यावरणपूरक काथ्यासाठी कोणताही खर्च येत नाही. रानातील माती, पाणी आणि शेण शेतकऱ्यांकडे मुबलक उपलब्ध असते. त्याचा वापर करून वेस्ट सुपारीच्या टरफलापासून उत्पन्न काढता येते, याची जाणीव तिने शेतकऱ्यांना करून दिली आहे. या काथ्याचा वापर सोफा, गाद्या आणि पायपुसणीसाठी होऊ शकतो. त्यामुळे सुपारीची टरफल जाळण्यापेक्षा त्यापासून काथ्या उत्पादन घेणे हा उद्योग नारळाच्या काथ्याप्रमाणे वाढू शकतो, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना जोडधंदा
काथ्या उत्पादन हा पारंपरिक, कृषी संलग्न निर्यातक्षम उद्योग आहे. त्यासाठीचा, कच्चा माल शेतकऱ्यांकडे मुबलक असतो. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणारा हा लघुद्योगच आहे. त्यासाठी जादा कष्ट किंवा मनुष्यबळाची गरज नाही. सुपारी उत्पादन घेणाऱ्या भागात काथ्या उद्योग विकसित होऊ शकतो. इतर उद्योगांच्या तुलनेत त्यासाठी भांडवल कमी लागते. परिणामी कोकणवासियांसाठी काथ्या उद्योग जोडधंदा ठरणार आहे.
अकरावीपासूनच संशोधनाची आवड
अकरावी-बारावीत प्रयोगशाळेत प्रयोग करताना काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. परंतु संशोधन, पेटंटसंदर्भात मार्गदर्शनासाठी मर्यादा आल्या. विद्यापीठात शिक्षक, कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिवांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यातूनच विद्यार्थी दशेतच पेटंट मिळवू शकले. सुट्टीला कोकणात गेल्यानंतर संशोधनाला सुरूवात केली. तीन महिन्यानंतर प्रयोग यशस्वी झाला, अन हाती सुपारीच्या काथ्याचे प्रॉडक्ट लागले. याला आफ्रिकेचे पेटंट मिळाले आहे. भारताचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गायत्री गोखले (संशोधक विद्यार्थिनी)
काथ्याला बाजारात मागणी
माती व शेणात जास्त प्रमाणात (बॅक्टेरिया) सूक्ष्मजीव असल्याने सुपारीच्या टरफलापासून काथ्या तयार होण्यास मदत होते. सुपारीची टरफल शेण, माती आणि पाण्यात जमिनीत गाडल्यानंतर सातत्याने तपासून काय अवस्था आहे, याच्या नोंदी घ्याव्या लागतात. दीड-दोन महिन्यांनी त्याचा काथ्या तयार होतो. त्यापासून विविध आकर्षक वस्तू बनवता येतात. काथ्याला बाजारात मागणी असल्याने विविध कंपन्यांही हा काथ्या विकत घेतात. विद्यार्थीदशेतच पेटंटची मानकरी ठरलेल्या गायत्री गोखलेला ‘पेटंट ब्रॅंड अॅम्बॅसिडर’ बहुमान देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.