चव्वेचाळीस अपत्यांना दिला जन्म
कोणत्याही विवाहित महिला अपत्यांना जन्म देण्याची इच्छा बाळगून असते, हे सर्वश्रुत आहे. पण एक महिला जास्तीत जास्त किती अपत्यांना जन्म देऊ शकेल याला काही मर्यादा असते. सध्याच्या काळात तर 1 किंवा जास्तीत जास्त 2 अपत्यांना जन्म दिला जातो. विवाहित जोडपी तसे ‘प्लॅनिंग’ करतात. तथापि, याच आधुनिक काळात युगांडा देशात एक महिला अशी आहे, की जी 15 वेळा गर्भवती राहिली आहे आणि तिने तब्बल 44 अपत्यांना जन्म दिला आहे. कोणालाही अविश्वसनीय वाटावी अशीच ही बाब म्हणता येईल.
या मातेचे नाव मारियम नाबांताजी असे असून ती 43 वर्षांची आहे. केवळ 15 गर्भारपणांमध्येच तिने इतक्या अपत्यांना जन्म दिले असून हे एक आश्चर्यच मानले जाते. तिने पाच वेळा प्रत्येक चार अपत्यांना जन्म दिला. तिच्या 44 अपत्यांपैकी 6 जणांचा मृत्यू बालवयातच झाला. त्यामुळे सध्या 38 अपत्ये जिंवत आहेत. तिला ‘मम्मा युगांडा’ या नावाने ओळखले जाते. या महेलेची कहाणी तशी दु:खदायक आहे. तिचा जन्म झाल्यानंतर तीन दिवसांमध्येच तिच्या आईने तिच्या 5 भावांसह तिचा त्याग केला. ती 12 वर्षांची झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिला लग्नाच्या नावाखाली विकून टाकले. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिने पहिल्या अपत्याला जन्म दिला. त्यानंतर वयाच्या 36 व्या वर्षांपर्यंत तिने आणखी 43 अपत्यांना जन्माला घातले. जिवंत असलेल्या तिच्या 38 अपत्यांमध्ये 20 पुत्र आणि 18 कन्या आहेत. तिचे सर्वात मोठे अपत्य आज 31 वर्षांचे आहे तर सर्वात छोट्या अपत्याचे वय 6 वर्षे आहे. तिने पाच वेळा प्रत्येकी चार, पाच वेळा प्रत्येकी तीन आणि चार वेळा प्रत्येक दोन अपत्यांचे मातृत्व स्वीकारलेले आहे.
तिला प्रत्येकवेळी जुळी, तिळी किंवा त्याहूनही अधिक मुले कशी होतात, हे वैद्यकशास्त्रालाही न सुटलेले कोडे आहे. या महिलेचे अंडाशय इतर महिलांच्या तुलनेत बरेच मोठे आहे, हे एक कारण स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही तिची ही इतकी बाळंतपणे आणि अपत्ये हे एक आश्चर्यच मानले जात आहे.