गौरी हत्तीचा आजाराने मृत्यू
जोयडा तालुक्यातील हत्ती शेल्टरमधील घटना
कारवार : जोयडा तालुक्यातील व्याघ्र आरक्षीत प्रदेशातील हत्ती शेल्टर (कॅम्प) मध्ये दोन वर्षीय गौरी नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा गुरुवारी आजारामुळे मृत्यू झाला. हत्ती शेल्टरमधील पर्यटकांचे आकर्षण बनून राहिलेले गौरी पिल्लू गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्या पिल्लाला कोणता आजार जडला होता हे अद्याप वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. गौरीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जेसीबीच्या मदतीने खड्डा तयार करण्यात आला आणि त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अंत्यसंस्कारापूर्वी गौरीच्या पार्थिवाची पूजा करण्यात आली. गेल्या तीन महिन्यात जोयडा तालुक्यात हत्तींचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना. तीन महिन्यापूर्वी जोयडा तालुक्यात विद्युत स्पर्शाने एका हत्तीचा मृत्यू झाला होता.