For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध चवीच्या भोजन आस्वादाने गौरी तृप्त

11:27 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध चवीच्या भोजन आस्वादाने गौरी तृप्त
Advertisement

तृप्त गौरीच्या आशीर्वादाने महिलांमध्ये उत्साह : झिम्मा, फुगडी, धार्मिक गीते-भक्तिगीते सादर

Advertisement

बेळगाव : अनेक विविध चवीच्या भोजनाचा आस्वाद घेऊन घरोघरच्या गौरी मंगळवारी तृप्त झाल्या आणि त्यांनी घरच्या महालक्ष्मींना उदंड आशीर्वाद दिले. सोमवारी बसविण्यात आलेल्या गौरीच्या भोजनाचा थाट मंगळवारी उडाला. आणि अनेकविध चवीच्या स्वयंपाकांनी घराघरात सुगंध दरवळू लागला. महिलांनी केलेल्या बहुविध चवीच्या भाज्यांचा, खमंग कोशिंबीरी, कुरकुरीत सांडगे, पापड आणि पंचपक्वान्ने यांनी गौरीच्या समोरील ताटे सजली आणि त्यांच्या आशीर्वादाने महिलांचा उत्साह दुणावला. सोमवारी गौरी बसविण्यात आल्या. मंगळवारी ज्यांच्याकडे उभी किंवा बैठी गौर असते त्यांनी तिला रेशमी वस्त्र नेसवून, मुखवटा बसवून तिला अनेक अलंकार घातले. तसेच तिच्या सभोवती फुले आणि माळांच्या साहाय्याने आकर्षक अशी आरास केली. गौरी सजविण्यासाठी महिलांची सकाळपासूनच धांदल सुरू होती.

गौरी सजविल्यानंतर त्यांनी पदर खोचला आणि त्या स्वयंपाकाला लागल्या. त्याची अर्धी तयारी सोमवारी करून ठेवली होती. याशिवाय दोन दिवस आधीच फराळही करून ठेवला होता. काही घरांमध्ये फराळाची ताटे देवीसमोर ठेवण्यात येतात. काही ठिकाणी गौरी प्रतिष्ठापना करण्यासाठी खास मंडप असतो. त्या मंडपाच्या आतल्या बाजूला हुक्क लावलेले असते. त्याला करंजी, लाडू, चकली, सानोऱ्या असे पदार्थ टांगण्यात आले होते. मंडपावर साखरेची पोळी, किंवा मांडे झाकण्यात आले होते. गहू किंवा तांदळाच्या राशीवर गौरी बसविण्यात आल्या होत्या. त्यांच्या पोटामध्ये श्रावणात घातलेले धागे होते. बुधवारी ते धागे काढून महिला सात, चौदा किंवा सोळा पदरी धागे आपल्या गळ्यात बांधून घेतील. त्यानंतर या गौरीची ओटी वाळकाच्या खापेने भरली जाते. त्यामुळे बाजारपेठेत वाळकांची आवक दोन दिवसांपासून वाढल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

गौरीसमोर जागर

सायंकाळी महिलांनी परस्परांना हळदी-कुंकवासाठी बोलावले. आणि त्या निमित्ताने घरोघरी गौरीच्या आराशीचे विविध रूपही पाहायला मिळाले. साखर, फुटाणे देऊन वाळकाची खाप घालून महिलांनी ओटी भरली आणि रात्री गौरीसमोर जागर केला. या निमित्ताने झिम्मा, फुगडी हे खेळही झाले. काही ठिकाणी धार्मिक गीते किंवा भक्तिगीते सादर झाली.

Advertisement
Tags :

.