For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाप्पा, आम्हाला माफ कर!

06:50 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाप्पा  आम्हाला माफ कर
Advertisement

महानगरपालिकेचे दुर्लक्ष : कंत्राट देऊन हात झटकण्याचा प्रयत्न : गणेशोत्सव महामंडळांनींही आत्मचिंतन करण्याची गरज

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

कपिलेश्वर तलावांमध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. विसर्जन करताना लोखंडी रॉड तसेच मोठे पाटही सोडण्यात आले होते. ते लोखंडी रॉड आणि पाट काढण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. वास्तविक हे काम महानगरपालिकेचे आहे. मात्र, कंत्राट देऊन त्यांनी हात झटकले आहेत. परिणामी मूर्तींची विटंबना होत असल्याचा आरोप आता सामाजिक कार्यकर्त्यांतून होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळांनींही या प्रकाराकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.

Advertisement

गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून आम्ही दहा दिवस भक्तीभावाने पूजा-अर्चा करत असतो. मात्र, त्यानंतर जड अंत:करणाने गणेशमूर्तींचे विसर्जन करत असतो. मात्र, मूर्तींची उंची आणि भव्यताही दिवसेंदिवस त्रासाची ठरत आहे. यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असल्यामुळे त्या विरघळणेही अशक्य होत आहे. मूर्तीची विटंबना होते. म्हणून अनेक मंडळे लोखंडी रॉड आणि पाट तसेच सोडून देत आहेत. मात्र, आता ते काढताना त्याची विटंबना होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

उत्सवाचे पावित्र्यच हरवत असल्याच्या प्रतिक्रिया

संपूर्ण राज्यात बेळगावमध्ये सर्वात भव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशाच्या आगमनाबरोबरच गणेशाची भक्तीभावाने दहा दिवस पूजा-अर्चा केली जाते. शहरामध्ये जवळपास चारशेच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामधील बहुसंख्य मंडळे कपिलेश्वर येथील दोन्ही तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करत असतात. अनंतचतुर्दशीदिवशी भव्य मिरवणूक काढून मूर्तींचे विसर्जन केले जाते. बऱ्याच वेळा चोवीस तासांपेक्षाही अधिक वेळ ही मिरवणूक काढली जाते. यावर्षी तर दुसऱ्या दिवशी रात्री बारापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे या उत्सवाचे पावित्र्यच हरवत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

गणेशमूर्ती विरघळत नसल्याने समस्या

दरवर्षी महानगरपालिका गणेशमूर्ती काढून त्या मूर्ती नेण्यात येत होत्या. मात्र, आता कंत्राट देण्यात आले आहे. शनिवारी तलावातील गणेशमूर्ती काढण्यात येत होत्या. त्या गणेशमूर्ती पाण्यामध्ये विरघळल्याच नाहीत. गणेशमूर्तींचा रंगही तसाच होता. मूर्तींची उंची अधिक असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. याचबरोबर शाडूच्या मूर्ती राहिल्या तरच त्या पाण्यामध्ये विरघळू शकतात. तेव्हा यावर सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार करण्याची वेळ देखील आली आहे. महानगरपालिकेनेही मूर्ती काढण्याचे कंत्राट इतरांना देण्याऐवजी स्वत:च त्या मूर्ती काढून नेहमीप्रमाणे नेणे गरजेचे आहे. मात्र, महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.